Donald Trump: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता इराणच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, यावरून जागतिक राजकारण पेटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वादात थेट उडी घेतली असून, खामेनींचा मुलगा मोजतबा खामेनी याला वारसदार म्हणून स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इराणचा पुढचा नेता कोण असेल, हे ठरवण्यात अमेरिका सहभागी असेल, असे सांगत ट्रम्प यांनी इराणच्या अंतर्गत राजकारणात थेट हस्तक्षेपाचे संकेत दिले आहेत.
मोजतबा खामेनी यांचा पत्ता कापला?
अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव मोजतबा खामेनी यांचे नाव सर्वोच्च नेतेपदासाठी आघाडीवर होते. मोजतबा यांचे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सशी जवळचे संबंध असून ते कट्टरपंथी विचारांचे मानले जातात. मात्र, एका मुलाखतीत ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले की, "मोजतबा खामेनी मला मंजूर नाही. आम्हाला असा नेता हवा आहे जो इराणमध्ये शांतता आणि सलोखा आणेल, जुन्या कट्टरपंथी धोरणांना पुढे नेणारा नेता नको."
इराणची तुलना वेनेझुएलाशी!
ट्रम्प यांनी इराणमधील परिस्थितीची तुलना वेनेझुएलाशी केली आहे. "इराणच्या नवीन नेत्याच्या नियुक्ती प्रक्रियेत माझा सहभाग आवश्यक आहे, जसा वेनेझुएलामध्ये डेल्सी रॉड्रिग्जच्या बाबतीत झाला होता. अमेरिकेच्या सहभागाशिवाय नवीन नेता निवडणे म्हणजे वेळ वाया घालवणे असेल," असे विधान ट्रम्प यांनी केले. जर इराणने जुन्याच धोरणांचे नेतृत्व निवडले, तर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष येणाऱ्या काळात अधिक भीषण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या ३७ वर्षांपासून इराणवर राज्य करणाऱ्या खामेनींच्या निधनानंतर, नवीन नेता निवडण्यासाठी ८८ सदस्यीय तज्ज्ञांचे पॅनेल काम करत आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या आठवड्यात नवीन नेत्याची घोषणा होईल असे सांगितले असले तरी, ट्रम्प यांच्या विधानामुळे या प्रक्रियेवर अमेरिकेचा दबाव निर्माण झाला आहे.
लष्करी कारवाईचा इशारा
ट्रम्प यांनी केवळ विधानेच केली नाहीत, तर कृतीचेही संकेत दिले आहेत. पाश्चिमात्य देशांचे समर्थन असलेले कुर्द लढाऊ आता इराणच्या सीमेवर हालचाली वाढवू शकतात, जेणेकरून तेहरानमधील सत्ताधाऱ्यांवर दबाव येईल. "इराणमध्ये केवळ लष्करी विजय पुरेसा नाही, तर तिथली व्यवस्था बदलणे गरजेचे आहे," असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
Web Summary : Trump opposes Khamenei's son as Iran's next leader, signaling US involvement. He compares Iran to Venezuela and warns of increased conflict if old policies continue. Military action is hinted at.
Web Summary : ट्रम्प ने ईरान के नेता के लिए खामेनी के बेटे का विरोध किया, अमरीका की भूमिका का संकेत दिया। उन्होंने ईरान की तुलना वेनेजुएला से की और चेतावनी दी कि पुरानी नीतियों से संघर्ष बढ़ेगा। सैन्य कार्रवाई का संकेत।