...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:58 IST2026-04-06T16:56:30+5:302026-04-06T16:58:03+5:30
आम्ही हे युद्ध अमेरिकेच्या अटींवर संपवणार नाही. कोणतीही वाटाघाटी आमच्या राष्ट्रीय हिताचा विचार करूनच केली जाईल असं इराणनं स्पष्ट सांगितले आहे.

...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
मध्य पूर्वेत अमेरिका इस्रायलविरुद्ध इराण युद्धाला १ महिना उलटला आहे मात्र अद्यापही स्ट्रेट होर्मुझवर कुठलाही समाधानकारक तोडगा निघाला नाही. युद्ध संपवण्याच्या दिशेने दोन्ही बाजूने चर्चा यशस्वी ठरल्या आहेत. पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीने मिळून अमेरिका इराण यांच्यात मध्यस्थीचा प्रयत्न केला परंतु त्यावरही ठोस तोडगा निघताना दिसत नाही.
पाकिस्ताननं पाठवलेला प्रस्ताव फेटाळला
पाकिस्तानकडून आयोजित होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादने पाठवलेला १५-कलमी शांतता प्रस्ताव इराणने स्पष्टपणे फेटाळला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मध्यस्थामार्फत पाठवलेला हा शांतता प्रस्ताव इराणने नाकारला आहे. आम्ही हे युद्ध अमेरिकेच्या अटींवर संपवणार नाही. कोणतीही वाटाघाटी आमच्या राष्ट्रीय हिताचा विचार करूनच केली जाईल असं त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांचं इराणविरोधात वादग्रस्त विधान
दुसरीकडे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला करण्यासाठी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. जर इराणने मंगळवार ७ एप्रिलच्या रात्री ८ पर्यंत होर्मुझ स्ट्रेट खुले करण्यासाठी हालचाली केल्या नाहीत तर त्यांच्याकडे ना कुठला पॉवर प्लांट राहील आणि ना कुठलाही पूल सुरक्षित राहील अशी थेट धमकी दिली आहे. मात्र ट्रम्प यांच्या इशाऱ्याचा इराणवर फारसा प्रभाव पडताना दिसत नाही. त्यामुळे ट्रम्प जास्त भडकले आहेत आणि त्यांनी इराणविरोधात अपमानास्पद शब्दांत तिखट भाष्य केले आहे.
इराणच्या मागे चीन-रशियाची ताकद?
पश्चिम आशियातील युद्ध सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला. अमेरिका इस्रायल पूर्ण ताकदीने इराणला हरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु या दोन ताकदवान देशांविरोधात इराण एकटा लढत आहे. मात्र चीन आणि रशिया अप्रत्यक्षपणे युद्धात इराणला मदत करत असल्याचे बोलले जाते. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अलीकडेच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी फोनवरून संवाद साधला. इस्रायल आणि अमेरिका आमच्या सर्व औद्योगिक पायाभूत सुविधा, कारखाने, हॉस्पिटल, शाळा आणि रहिवासी परिसरांना टार्गेट करत आहे. या हल्ल्यांचा परिणाम संपूर्ण परिसरात तसेच जागतिक स्थिरता, सुरक्षेवर पडू शकतो असं इराणने सांगितले.
युद्ध का संपत नाही?
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध जय पराजयापेक्षा दोन्ही देशांच्या प्रतिष्ठेचे बनले आहे. दोन्ही देश एकमेकांना झुकण्यास भाग पाडत असून कुणीही आपले पाऊल मागे घ्यायला तयार नाही. डोनाल्ड ट्रम्प सातत्याने इराणला मागे हटण्यासाठी धमक्या देत आहेत तर इराणनेही सडेतोड प्रत्युत्तर देऊ असं स्पष्ट बजावले आहे.