'वडिलांसोबत कोणतेही नाते ठेवायचे नाही...', इलॉन मस्क यांच्या ट्रांसजेंडर मुलीची कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 17:50 IST2022-06-21T17:49:31+5:302022-06-21T17:50:22+5:30
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण आहे त्यांची ट्रान्सजेंडर मुलगी.

'वडिलांसोबत कोणतेही नाते ठेवायचे नाही...', इलॉन मस्क यांच्या ट्रांसजेंडर मुलीची कोर्टात धाव
वॉशिंग्टन: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण आहे त्यांची ट्रान्सजेंडर मुलगी. त्यांच्या मुलीने तिचे नाव बदलून विवियन जेना विल्सन ठेवण्यासाठी आणि नवीन जन्म प्रमाणपत्रावर तिची नवीन लिंग ओळख दाखवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. ती म्हणते की, तिला मस्क यांच्यासोबत राहायचे नसून, त्यांच्याशी कोणताही संबंधही ठेवू इच्छित नाही.
ऑनलाइन कागदपत्रात नाव बदलण्यात आले
मस्कच्या मुलीचे पहिले नाव झेवियर अलेक्झांडर मस्क आहे. ती अलीकडेच 18 वर्षांची झाली आहे. तिच्या आईचे नाव जस्टिन विल्सन आहे. तिने 2008 मध्ये मस्कंना घटस्फोट दिला होता. काही काळापूर्वी झेवियर पुरुषातून स्त्रीमध्ये बदलली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑनलाइन डॉक्युमेंटमध्ये झेवियर हे नाव बदलण्यात आले आहे.
एप्रिलमध्ये नाव बदलण्याची याचिका दाखल
मस्कच्या मुलीने नावात बदल आणि तिची नवीन लिंग ओळख दर्शवणारे नवीन जन्म प्रमाणपत्र या दोन्हीसाठी एप्रिलमध्ये सांता मोनिका येथील लॉस एंजेलिस काउंटी सुपीरियर कोर्टात याचिका दाखल केली होती. हे अलीकडेच काही ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे.
मस्क यांची प्रतिक्रिया नाही
मुलीचे नाव आणि लिंग बदलाची कागदपत्रे न्यायालयात दाखल झाल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर मस्क यांनी मे महिन्यात रिपब्लिकन पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी देशभरातील राज्यांमध्ये ट्रान्सजेंडर अधिकार मर्यादित करण्याच्या कायद्याचे समर्थन करतात. दरम्यान, या प्रकारावर मस्क यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.