कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 06:48 IST2025-12-15T06:48:05+5:302025-12-15T06:48:21+5:30

मोठ्या पदावर असलेल्या बाई यांनी पदाच्या माध्यमातून जेवढा पैसा लाटता येईल तेवढा लाटला आणि स्वतःचं उखळ पांढरे करून घेतलं.

'No forgiveness' for corrupt people! Chinese banker sentenced to death for corruption | कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड

कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड

जगात असा कोणता देश आहे, जिथे भ्रष्टाचार नाही? अर्थातच जगात कोणताही देश धुतल्या तांदळाचा नाही. ज्या देशामध्ये गुन्हेगारांवर आत्यंतिक कडक कारवाई केली जाते, असे देशही भ्रष्टाचार रोखू शकलेले नाहीत. बरं, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई तरी कोणती होते? बऱ्याचदा आणि बऱ्याच देशांमध्ये अशा भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाईच होत नाही किंबहुना असे लोक खुलेआम फिरतात, कारण त्यांच्यावरचे आरोपच सिद्ध होऊ शकत नाहीत. सिद्ध झाले तर त्यांच्यावरची कारवाईदेखील नाममात्रच असते.

गुन्हेगारांना कायमचं वठणीवर आणणारे आणि त्यांना दिलेल्या शिक्षा पाहून असे काही करण्याची कोणाची छाती होणार नाही, अशा देशांमध्ये काही आखाती देशांचा आणि चीनचा समावेश होतो. गुन्हेगारांना आत्यंतिक कडक शिक्षा करण्याविषयी आणि त्यासंदर्भातले सर्व नियम धाब्यावर बसविण्याबाबत या देशांची ख्याती आहे. चीनमध्ये नुकताच असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. ही घटना सध्या जगभर गाजते आहे.

चीनमधील 'चायना हुआरोंग इंटरनॅशनल होल्डिंग्स' (सीएचआयएच) या सरकारी अॅसेट मॅनेजमेंट फर्मचे माजी जनरल मॅनेजर बाई तियानहुई यांच्याशी संबंधित हे प्रकरण आहे. मोठ्या पदावर असलेल्या बाई यांनी पदाच्या माध्यमातून जेवढा पैसा लाटता येईल तेवढा लाटला आणि स्वतःचं उखळ पांढरे करून घेतलं. २०१४ ते २०१८ दरम्यान प्रोजेक्ट्सचं अधिग्रहण आणि आर्थिक फायदा करून देण्याच्या बदल्यात त्यांनी तब्बल १५६ दशलक्ष डॉलरहून जास्त लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवलं गेलं. त्यांनी भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध झाल्यानंतर या बँकरला चीननं थेट मृत्युदंड दिला.

खरं तर भ्रष्टाचाराविरोधात चीनमधील कायदे अतिशय कडक असले तरी बऱ्याचदा भ्रष्टाचाऱ्याला थेट मृत्युदंड दिला जात नाही. त्याच्याविरोधातला आरोप सिद्ध झाल्यानंतर दोन वर्षांनी त्याला मृत्युदंड दिला जातो आणि नंतर त्याची मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलली जाते. आजपर्यंत अनेकदा असं झालं आहे आणि गुन्हेगारांना दिलासा मिळाला आहे. आता मात्र चिनी सरकार आणि न्यायालयाने भ्रष्टाचाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत माफ न करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो आहे. त्यामुळेच या बँकरला थेट मृत्युदंड देण्यात आला आहे. 

बाई यांना पहिल्यांदा मे २०२४ मध्ये उत्तरेतील तियानजिन शहरातील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. ती निलंबित केली जाईल असं बाई, यांच्या नातेवाइकांना वाटत होतं, पण ही शिक्षा निलंबित करण्यात आली नाही. हुआरोंग या फर्मचे इतरही अनेक अधिकारी भ्रष्टाचार प्रकरणात अडकले आहेत.

'सीएचआयएच' ही चायना हुआरोंग अॅसेट मॅनेजमेंटची सबसिडियरी आहे, जी देशातील सर्वात मोठ्या अॅसेट मॅनेजमेन्ट फंड्सपैकी एक आहे. याच फर्मचे माजी चेअरमॅन लाई शियाओमिन यांनाही जानेवारी २०२१ मध्ये २५३ दशलक्ष डॉलरची लाच घेतल्याप्रकरणी फाशी देण्यात आली होती.

बाई यांनी शिक्षेविरोधात अपील केलं; पण फेब्रुवारीमध्ये आधीचाच निर्णय कायम ठेवला गेला. चीनच्या सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा कायम ठेवताना सांगितलं की बाई यांचे गुन्हे 'अत्यंत गंभीर' आहेत. बाई यांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना भेटू दिल्यानंतर तियानजिनमध्ये फाशी देण्यात आली.

Web Title : भ्रष्टाचार के आरोप में चीन में बैंकर को मृत्युदंड।

Web Summary : चीन में एक बैंकर, बाई तियानहुई, को 156 मिलियन डॉलर से अधिक रिश्वत लेने के आरोप में फांसी दी गई। भ्रष्टाचार विरोधी सख्त कानूनों के बावजूद, चीन शायद ही कभी मृत्युदंड देता है। यह मामला 2021 में इसी तरह के निष्पादन के बाद भ्रष्टाचार के खिलाफ एक कठोर रुख का संकेत देता है।

Web Title : China Executes Banker for Corruption Involving Millions of Dollars.

Web Summary : A Chinese banker, Bai Tianhui, was executed for accepting over $156 million in bribes. Despite strict anti-corruption laws, China rarely imposes the death penalty. This case signals a harsher stance against corruption, following a similar execution in 2021.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.