CoronaVirus News: कोरोनापेक्षा भयंकर असेल पुढील महामारी; लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञाच्या भाकितानं झोप उडवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 18:08 IST2021-12-06T18:07:28+5:302021-12-06T18:08:41+5:30
CoronaVirus News: ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या सारा गिल्बर्ट यांची भविष्यवाणी

CoronaVirus News: कोरोनापेक्षा भयंकर असेल पुढील महामारी; लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञाच्या भाकितानं झोप उडवली
लंडन: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं जगाची झोप उडवली आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ४० हून अधिक देशांमध्ये ओमायक्रॉननं शिरकाव केला आहे. यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. डेल्टामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात येत असताना ओमायक्रॉननं काळजी वाढवली आहे. त्यातच आता ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या सारा गिल्बर्ट यांच्या भविष्यवाणीनं चिंतेत भर घातली आहे.
भविष्यातील महामारी कोरोना विषाणूपेक्षा अधिक घातक असू शकतात. कोरोनानं आपल्याला दिलेला धडा आपण विसरता कामा नये. पुढील विषाणू हल्ल्यासाठी तयार आहोत ही गोष्ट जगानं लक्षात ठेवायला हवी, असं सारा म्हणाल्या. कोरोना महामारीनं जगाचं खूप मोठं नुकसान केलं आहे. आतापर्यंत ५२ लाख ७३ हजार ३१० जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेची खूप मोठी हानी झाली आहे.
यापुढे येणारी महामारी अधिक धोकादायक असू शकेल, असं भाकित सारा गिल्बर्ट रिचर्ड डिम्बलबी व्याख्यानावेळी वर्तवलं. पुढची महामारी अधिक संक्रामक किंवा जीवघेणी किंवा दोन्ही असू शकते. एखादा विषाणू आपल्या जीवनासाठी धोका ठरतो हे काही शेवटचं नाही. यापुढे अनेक संकटं येऊ शकतात आणि त्यांचा सामना करण्यासाठी जगानं तयार राहायला हवं, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.
कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी होत असलेले प्रयत्न असमान असल्याचं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटतं. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोरोना लसींचा साठा मर्यादित स्वरुपात पोहोचत आहे. तर श्रीमंत देशांमध्ये परिस्थिती उलट आहे. तिथले धनाढ्य लोक बूस्टर डोस घेत आहेत. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं एक स्थायी पॅनल स्थापन करावं अशी गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.