चिन्मय दास यांची बाजू मांडणाऱ्यांना हिंदू वकिलांना धमक्या; कोर्टात कुणीच न आल्याने महिन्याभराने सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:27 IST2024-12-03T16:26:59+5:302024-12-03T16:27:21+5:30
चिन्मय दास यांचा खटला लढण्यासाठी कोणताही वकील पुढे आलेला नसल्याने त्यांना महिनाभर तुरुंगात रहावे लागणार आहे.

चिन्मय दास यांची बाजू मांडणाऱ्यांना हिंदू वकिलांना धमक्या; कोर्टात कुणीच न आल्याने महिन्याभराने सुनावणी
Chinmoy Krishna Das : बांगलादेशातील कट्टरवाद्यांच्या धमक्यांमुळे अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलेल्या चिन्मय दास यांचा खटला लढण्यासाठी कोणताही वकील पुढे आलेला नाही. त्यामुळे चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना एक महिना तुरुंगात घालवावा लागणार आहे. याआधी चिन्मय दास यांच्या आधीच्या वकिलाच्या घरी झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चिन्मय दास यांचे वकील हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत.
बांगलादेश सरकारने चिन्मय कृष्णा दास यांच्या जामीन अर्जाप्रकरणी न्यायालयाकडे आणखी वेळ देण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र सरकारने वेळ मागितल्याने पुढील सुनावणीची २ जानेवारी रोजी होणार आहे.
सुनावणीदरम्यान अनेक वकिलांनी चिन्मय कृष्ण दास यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. सुनावणीआधीच चिन्मय दास यांचा खटला लढणाऱ्या वकिलावर जीवघेणा हल्ला झाला होता. मात्र, बांगलादेश सरकारने अद्याप या हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही. चिन्मय कृष्ण दास यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली असून त्यांच्या अटकेपासून हे निदर्शने करण्यात येत आहेत.
बार असोसिएशनच्या वकिलांनी कोणत्याही कायदेशीर व्यावसायिकाला चिन्मय दास यांचा खटला लढण्यास मनाई केली आहे. त्यामुळे कोणताही वकील चिन्मय दास यांच्या बाजूने न्यायालयात उभा राहिला नाही. त्यानंतर चट्टोग्राम न्यायालयाने सुनावणी २ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.
चिन्मय कृष्ण दास यांचे वकील रामेन रॉय यांच्यावर क्रूर हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या घराची तोडफोड केल्याचेही इस्कॉन इंडियाने सोमवारी सांगितले. रॉय हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत असल्याचे त्यांनी म्हटलं. मुस्लिमबहुल बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंचा आवाज बंद करण्याच्या प्रयत्नात इस्लामवाद्यांचे हल्ले आणि धमक्यांचा हा एक भाग आहे, असंही इस्कॉनने म्हटलं.
दुसरीकडे, चितगाव बार असोसिएशनचा भाग असलेले मुस्लिम वकिल सतत हिंदू वकिलांनाना धमकावत आहेत. खटला न लढवण्यासाठी वकिलांना धमक्या सतत दिल्या जात असल्याचे, दास यांच्या कायदेशीर संघाने सांगितले. तसेच काही वकिलांच्या चेंबरची तोडफोड करण्यात आली आणि हिंदू वकिलांना धमकावले गेल्याचेही चट्टोग्राममधील एका पुजाऱ्याने सांगितले.