पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:32 IST2025-11-05T12:30:18+5:302025-11-05T12:32:17+5:30
New York Mayor: डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः विरोध केला, तरीही ममदानी यांनी विजय खेचून आणला.

पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
New York Mayor: नुकतीच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जोहरान ममदानी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. ममदानींच्या रुपात न्यूयॉर्कला पहिला मुस्लिम महापौर मिळाला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर ममदानी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
इतिहासात असे क्षण विरळा असतात...
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ममदानी म्हणाले, “आज मला पंडित नेहरुंचे ते शब्द आठवतात, जे त्यांनी भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उद्गारले होते. 'इतिहासात असे क्षण विरळाच येतात, जेव्हा आपण जुन्या युगातून नव्या दिशेने वाटचाल करतो. जेव्हा एका युगाचा अंत होतो, तेव्हा दीर्घकाळ दडपलेल्या राष्ट्राची आत्मा मुक्तपणे व्यक्त होते.' आज न्यूयॉर्कने हेच केले आहे. जुन्याला निरोप देत नव्या, धाडसी, दूरदर्शी युगाचा आरंभ केला आहे,” अशी प्रतिक्रिया ममदांनी यांनी व्यक्त केली.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
VIDEO | USA: Addressing his supporters after winning New York city mayoral elections, Indian-origin democratic socialist lawmaker, Zohran Mamdani (@ZohranKMamdani), quotes former Prime Minister of India Jawaharlal Nehru in his victory speech.
— Press Trust of India (@PTI_News) November 5, 2025
He says, “Standing before you, I’m… pic.twitter.com/gydR3zPsql
ममदानींच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनीदेखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेते व्हिडिओ शेअर करत लिहिले, “नेहरुंचे विचार शतकानुशतके लोकांच्या मनात घर करुन आहेत. त्यांच्या कल्पना कधीच पुसल्या जाऊ शकत नाहीत.”
“I think of the words of Jawaharlal Nehru. A moment comes, which comes but rarely in history, when we step out from the old to the new, when an age ends, and when the soul of a nation, long suppressed, finds utterance.” @ZohranKMamdani invokes the immortal words from Pandit… pic.twitter.com/mbPnCOqHpO
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) November 5, 2025
ट्रम्पंना मोठा धक्का
या निवडणुकीची सर्वात महत्वाची बाब म्हणजे, ममदानींनी केवळ आपल्या प्रतिस्पर्ध्यांनाच पराभूत केले नाही, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी मतदानाच्या एक दिवस आधी ममदानींचा विरोध करत त्यांच्या प्रतिस्पर्धी अँड्र्यू कुओमो यांना पाठिंबा दिला होता. चक्क देशाचा प्रमुख विरोध करत असतानाही, ममदानी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
ममदानींचा भारताशी काय संबंध?
जोहरान ममदानी हे भारतीय-युगांडाई वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांचा जन्म युगांडाच्या कंपाला येथे झाला. त्यांची आई मीरा नायर या प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका आहेत (ज्यांनी सॅलाम बॉम्बे आणि मॉन्सून वेडिंग सारखे चित्रपट दिग्दर्शित केले), तर वडील प्रोफेसर महमूद ममदानी हे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. राजकारणात त्यांची सुरुवात कॉलेजपासूनच झाली होती. त्यांनी Students for Justice in Palestine या संघटनेचा स्थानिक विभाग स्थापन केला आणि 2020 मध्ये न्यूयॉर्क राज्य विधानसभेवर निवडून आले.