इस्रायल हमास युद्धामध्ये गाझा पट्टीतून आशेची नवी किरणं! ओलिसांबाबत भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:11 IST2025-01-09T13:10:46+5:302025-01-09T13:11:17+5:30
७ ऑक्टोबर २०२३ हा दिवस कोण विसरेल? याच दिवशी हमासनं इस्त्रायलवर अचानक हल्ला करून इस्त्रायलचे जवळपास १२०० नागरिक ठार मारले होते आणि सुमारे २५४ नागरिकांना ओलीस ठेवलं होतं.

इस्रायल हमास युद्धामध्ये गाझा पट्टीतून आशेची नवी किरणं! ओलिसांबाबत भावनिक आवाहन
७ ऑक्टोबर २०२३ हा दिवस कोण विसरेल? याच दिवशी हमासनं इस्त्रायलवर अचानक हल्ला करून इस्त्रायलचे जवळपास १२०० नागरिक ठार मारले होते आणि सुमारे २५४ नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. ध्यानीमनी नसताना हमासनं इतका मोठा हल्ला केल्यानं आणि त्यात निरपराध माणसं ठार मारल्यानं इस्त्रायलला हा फार मोठा धक्का होता आणि त्याचमुळे चिडलेल्या, संतापलेल्या इस्त्रायलनं प्रतिहल्ला केला होता. वर्षभरापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी हा संघर्ष अजूनही सुरू आहे.
हा संघर्ष तातडीनं थांबावा यासाठी अमेरिका, भारतासह अनेक देश प्रयत्न करीत आहेत; पण त्याला अजूनपर्यंत तरी यश आलेलं नाही. अधूनमधून त्याबाबत थोडं आशादायी वातावरण निर्माण होतं; पण पुन्हा जैसे थे! आज गाझा पट्टीत राहाणाऱ्या लोकांची अवस्था जणू नरकासमान झाली आहे. त्याविषयीच्या दु:खद कहाण्या वारंवार प्रसिद्ध होत असतात. या कहाण्या वाचताना सर्वसामान्य माणसांचं हृदयही विदीर्ण होत असतं.
या पार्श्वभूमीवर थोडी आशादायक बातमी पुन्हा एकदा ऐकायला आली आहे. हमासनं ओलीस ठेवलेल्या काही इस्त्रायली नागरिकांची सुटका करण्याचं नुकतंच कबूल केलं आहे. यासंदर्भात गेल्या कित्येक दिवसांपासून हमास आणि इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. आता हमास ज्या ३४ नागरिकांना सोडणार आहे, त्यात महिला, लहान मुलं, वृद्ध आणि काही आजारी सैनिकांचाही समावेश आहे. इस्त्रायलनं याबाबतची आपली पहिली यादीही हमासला पाठवली आहे. त्यात ३४ नागरिकांचा समावेश आहे. हमासनं या नागरिकांची सुटका करण्याचं कबूल तर केलं आहे; पण त्यासाठी त्यांनी साधारणपणे आठवडाभराची मुदतही मागितली आहे. यातले किती नागरिक जिवंत आहेत, हे पाहून, त्यांची खात्री करून मगच त्यांना सोडलं जाईल, असं हमासनं म्हटलं आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार इस्त्रायलनं जरी आपली पहिली यादी पाठवली असली तरी सुटका करण्यात येत असलेल्या नागरिकांची यादी अजून तरी हमासनं पाठवलेली नाही. हमासनं ज्या २५४ इस्त्रायली नागरिकांना ओलीस ठेवलं होतं, त्यातील १५० पेक्षा जास्त नागरिकांना याआधीच सोडून देण्यात आलं आहे. जवळपास शंभर इस्त्रायली नागरिकांना हमासनं अजूनही ओलीस ठेवलेलं आहे. त्यातील ३४ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत, याला इस्त्रायली सैनिकांनीही दुजोरा दिला आहे.
इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी १९ नोव्हेंबरला गाझा पट्टीचा दौरा केला होता. त्यावेळी इस्त्रायली नागरिकांना सुरक्षितपणे आमच्या ताब्यात सोपवणाऱ्याला पाच दशलक्ष डॉलर बक्षीस देण्याचीही घोषणा केली होती. गाझा पट्टीत युद्धबंदी व्हावी आणि इस्त्रायली ओलिसांची सुटका करावी, यासाठी दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. या समझौत्यासाठी अमेरिका, कतार आणि इजिप्त मुख्यत्वे मध्यस्थ म्हणून प्रयत्न करीत आहेत.
इस्त्रायलच्या ज्या नागरिकांना हमासनं ओलीस ठेवलं आहे, त्यांच्या सुटकेसाठी इस्त्रायलच्या नागरिकांकडूनही नेतन्याहू यांच्यावर मोठा दबाव येत आहे. नेतन्याहू यांच्या घराच्या बाहेर इस्त्रायली नागरिकांनी नुकतंच आंदोलनही केलं होतं. चार आंदोलकांना यावेळी पोलिसांनी अटक केली होती. यावरून इस्त्रायली नागरिकांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. दुसरीकडे हमासही या घटनेवरून जेवढं राजकारण करता येईल, तेवढं करीत आहे. त्यांच्या ताब्यात असलेल्या एका इस्त्रायली महिला सैनिकाचा व्हिडीओ नुकताच हमासनं प्रसारित केला आहे. हमासनं ७ ऑक्टोबर २०२३ला ज्या इस्त्रायली नागरिकांना ओलीस ठेवलं होतं त्यात लिरी एलबाग या महिला सैनिकाचाही समावेश होता. या व्हिडीओत इस्त्रायली नागरिकांची सुटका न होण्याबाबत लिरीनं इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना जबाबदार ठरवलं आहे.
या व्हिडीओत लिरी म्हणते, हमासनं आम्हाला ओलीस ठेवून वर्षभरापेक्षाही अधिक काळ उलटला आहे. देशासाठी रक्त सांडणाऱ्या आमच्यासारख्या सैनिकांना नेतन्याहू यांचं सरकार पूर्णपणे विसरलेलं दिसतंय. आमच्या सुटकेसाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. माझं वय आत्ताशी १९ वर्षं आहे. माझं संपूर्ण आयुष्य जणू ठप्प झाल्यासारखं आणि संपल्यासारखं वाटतं आहे.
ओलिसांबाबत भावनिक आवाहन
लिरीचा हा व्हिडीओ नेमका कधी रेकॉर्ड केला गेला, याविषयी कोणतीही माहिती नसली तरी लिरीच्या पालकांनी आणि जवळच्या नातेवाइकांनीही एका वेगळ्या व्हिडीओद्वारे पंतप्रधान नेतन्याहू आणि जगभरच्या नेत्यांना आवाहन केलं आहे, की इस्त्रायलच्या सर्वच ओलिसांना तातडीनं सोडवण्यासाठी प्रयत्न केले जावेत. हे सारे ओलीस तुमचीच मुलं, नातेवाईक आहेत, असं समजून तातडीनं निर्णय घ्या, असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं आहे.