नवीन कल्पनांमुळेच खुला होतो विकासाचा मार्ग... संशोधन करणाऱ्या तीन अर्थतज्ज्ञांना नोबेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:03 IST2025-10-14T15:02:49+5:302025-10-14T15:03:20+5:30
नोबेल समितीने सांगितले की, या अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि उत्पादनाच्या नवनवीन पद्धतींमुळेच सतत आर्थिक विकास शक्य होतो. नव्या कल्पना जुन्या पद्धतींना बदलून टाकतात - ही प्रक्रिया कधीही थांबत नाही.

नवीन कल्पनांमुळेच खुला होतो विकासाचा मार्ग... संशोधन करणाऱ्या तीन अर्थतज्ज्ञांना नोबेल
स्टॉकहोम : यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक अमेरिकेचे जोएल मोकिर तसेच पीटर हॉविट आणि ब्रिटनच्या फिलिप एगियॉन तीन प्रख्यात अर्थतज्ज्ञांना जाहीर करण्यात आले आहे. आर्थिक विकासात ‘इनोव्हेशन’ म्हणजेच नवकल्पनांचा कसा मोठा वाटा असतो, यावरील त्यांच्या अभ्यासासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
नोबेल समितीने सांगितले की, या अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि उत्पादनाच्या नवनवीन पद्धतींमुळेच सतत आर्थिक विकास शक्य होतो. नव्या कल्पना जुन्या पद्धतींना बदलून टाकतात - ही प्रक्रिया कधीही थांबत नाही.
जोएल मोकिर
(अमेरिका - अर्थशास्त्र आणि इतिहासाचे प्राध्यापक )
कार्य : औद्योगिक क्रांती कशी झाली, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कशाप्रकारे आर्थिक विकास घडवला
पीटर हॉविट
(अमेरिका - अर्थशास्त्राचे प्राध्यापक)
कार्य : आर्थिक विकास, नवकल्पना आणि पॉलिसीवर संशोधन. ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ महत्त्वाचे आर्थिक मॉडेल.
फिलिप एगियॉन
(अमेरिका - अर्थशास्त्राचे प्राध्यापक)
कार्य : आर्थिक विकास, उत्पादन आणि आव्हाने. ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ हे महत्त्वाचे आर्थिक मॉडेल
आर्थिक विकासाचा धडा...
जोएल मोकिर यांनी इतिहासाच्या अभ्यासातून दाखवून दिले की सततचा आर्थिक विकास शक्य होण्यासाठी समाजाने नव्या कल्पनांना स्वीकारण्याची मानसिकता ठेवणे अत्यावश्यक आहे. समाजात ‘नवे विचार स्वीकारण्याची मोकळीक’ हीच विकासाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’चा सिद्धांत
फिलिप एगियॉन आणि पीटर हॉविट यांनी १९९२ मध्ये ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ हे महत्त्वाचा आर्थिक मॉडेल मांडले. याचा अर्थ असा की, नवीन आणि सुधारित उत्पादन बाजारात आले की जुन्या तंत्रज्ञानाच्या कंपन्या मागे पडतात. ही प्रक्रिया रचनात्मक, तर दुसरीकडे विनाशकारी असते.