CoronaVirus News: कोरोना चीनची पाठ सोडेना; संसर्ग वाढल्यानं एकच खळबळ, विमाने रद्द, शाळा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 11:11 IST2021-10-22T10:59:27+5:302021-10-22T11:11:23+5:30
CoronaVirus News: कोरोनाचा पुन्हा झालेला उद्रेक पर्यटकांशी संबंधित असल्याने चीनने तातडीने उपरोक्त उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

CoronaVirus News: कोरोना चीनची पाठ सोडेना; संसर्ग वाढल्यानं एकच खळबळ, विमाने रद्द, शाळा बंद
बीजिंग : सलग पाचव्या दिवशीही कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने चीनने गुरुवारी कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी शेकडो उड्डाणे रद्द केली आहे. यासोबत शाळाही बंद केल्या आहेत. तसेच सामूहिक चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. चीनने सीमा बंदी आणि लक्ष्यित लॉकडाऊन करून कोविड-१९ ची साथ आटोक्यात आणली होती. परंतु, कोरोनाचा पुन्हा झालेला उद्रेक पर्यटकांशी संबंधित असल्याने चीनने तातडीने उपरोक्त उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
चीनच्या उत्तर आणि वायव्य क्षेत्रात नवीन रुग्ण आढळले आहेत. पर्यटकांच्या अनेक गटातील ज्येष्ठ जोडप्यापासून संसर्ग पसरला आहे. पर्यटकांचा हा गट शियान गान्सू प्रांत आणि अंतर्गत मंगोलियाकडे जाण्याआधी शांघायमध्ये होता. त्यांच्या या प्रवासादरम्यान त्यांच्या संपर्कात आल्याने नवीन रुग्ण आढळले.
कोरोनाचा नवीन उद्रेक वाढण्याआधीच त्याला आळा घालण्यासाठी हे पाच प्रांत आणि बीजिंगसह या विभागातील स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर चाचण्या सुरू केल्या आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निसर्गरम्य ठिकाणे आणि पर्यटन स्थळे, शाळा तसेच करमणुकीची ठिकाणे बंद केली आहेत. याशिवाय काही निवासी परिसरात लक्ष्यित लॉकडाऊन लागू केला आहे. वायव्य प्रांतातील लोकांना घराबाहेर न पडण्याचे सांगण्यात आले आहे.