नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 08:50 IST2025-09-12T08:47:48+5:302025-09-12T08:50:00+5:30

Nepal protests erupt over corruption and social media ban: अंतरिम सरकार स्थापनेबाबत विविध घटकांशी चर्चा सुरू आहे. मात्र, ते संबंधित लोक कोण याचा तपशील लष्कराच्या प्रवक्त्याने उघड केला नाही.

Nepal Youth are holding meetings on whose government it is; Gen Z talks with President Ramchandra Poudel for the second time | नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा

नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा

काठमांडू: नेपाळमध्ये आंदोलन करणाऱ्या जेन झी गटाच्या नेत्यांनी अंतरिम स्थापन करण्याकरिता तसेच या सरकारच्या नेत्याची निवड करण्याच्या दृष्टीने नेपाळचेराष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल, लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल यांच्याशी गुरुवारी भद्रकाली येथील लष्करी मुख्यालयात चर्चा सुरू केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की, कुलमान घिसिंग या दोघांपैकी एकाच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात यावे असा जेन झीचा आग्रह आहे. अशाच प्रकारच्या पहिल्या बैठकीत बुधवारी निर्णय होऊ शकला नव्हता.

विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अंतरिम सरकार स्थापन झाल्यावर त्याचा प्रमुख नेता ओली यांची जागा घेईल. 

नेपाळी लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, अंतरिम सरकार स्थापनेबाबत विविध घटकांशी चर्चा सुरू आहे. मात्र, ते संबंधित लोक कोण याचा तपशील लष्कराच्या प्रवक्त्याने उघड केला नाही. सध्याच्या राजकीय पेचातून मार्ग काढणे आणि त्याचबरोबर देशात कायदा व सुव्यवस्था राखणे या मुख्य उद्देशानेच ही चर्चा सुरू केली आहे. 

ही बैठक सुरू असताना त्यात काय निर्णय होतो याची माहिती घेण्यासाठी असंख्य युवक लष्करी मुख्यालयाबाहेर उभे होते. 

५ अब्ज रुपयांचे हॉटेल जळून खाक

नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारात, निदर्शकांनी काठमांडूतील सर्वात उंच हिल्टन हॉटेलला आग लावली. हे हॉटेल गेल्या वर्षी जुलैमध्ये पूर्ण झाले. त्यावर ५ अब्ज भारतीय रुपये खर्च करण्यात आले होते. 

हिल्टन हे काठमांडूतील सर्वात उंच ५ स्टार हॉटेल आहे, जे शंकर ग्रुप ऑफ नेपाळने बांधले आहे. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या हॉटेलने नेपाळला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर एक ठळक ओळख मिळाली होती.

लोकशाहीचे रक्षण करा; विद्यार्थ्यांची मागणी

ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळ मोठ्या राजकीय संकटात सापडला. परिणामी नेपाळी लष्कराने देशातील कायदा व सुव्यवस्थेची सूत्रे हातात घेतली. नेपाळची राजधानी काठमांडूच्या काही भागांमध्ये विद्यार्थी अद्यापही निदर्शने करत आहेत. नवीन सरकार स्थापन करताना संविधान, लोकशाही, मानवी हक्कांचे संरक्षण केले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नेपाळमधील हिंसाचारामागे कट?

आपल्या भविष्याबद्दल चिंतेत असलेला नेपाळ एका नवीन सुरुवातीची वाट पाहत असताना, बांगलादेश आणि श्रीलंकेतील सरकारांच्या हिंसक उलथवणीशी साम्य दिसून आले आहे. यानंतर, निरीक्षक या अराजकतेमागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.

८ सप्टेंबरपूर्वी तरुणांनी न्यायाची मागणी करण्यासाठी उत्स्फूर्त निदर्शने केली त्या दिवशी कोणत्याही कटाची शक्यता दिसत नाही. परंतु त्यानंतर झालेला अर्थहीन हिंसाचार हे स्पष्टपणे बाह्य आणि अज्ञात घटकांचे काम आहे, असे निरीक्षक म्हणत आहेत.

१५,०००पेक्षा अधिक कैद्यांचे पलायन 

काठमांडू: नेपाळमधील तुरुंगात गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आणखी तीन कैद्यांचा मृत्यू झाला. या आंदोलनाच्या काळात दोन डझनांहून अधिक तुरुंगांतून १५,००० पेक्षा अधिक कैदी पळून गेले आहेत.

काही कैद्यांनी गॅस सिलिंडरचा स्फोट घडवून तुरुंग फोडण्याचा प्रयत्न केला. त्यातून ही झटापट झाली. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. त्यात तीन जण ठार झाले.

१३ कैद्यांना भारतीय सुरक्षा दलाने पकडले. तसेच उर्वरित २१६ कैदी अजूनही फरार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

आंदोलन करणाऱ्या युवकांनी अनेक तुरुंगांवर धाड टाकून तेथील इमारती जाळल्या आणि तुरुंगाचे दरवाजे उघडू‍ दिले. जे हजारो कैदी तुरुंगातून पळून गेले, त्यापैकी काही जणच परत आले आहेत किंवा त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.

Web Title: Nepal Youth are holding meetings on whose government it is; Gen Z talks with President Ramchandra Poudel for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.