कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 15:17 IST2025-09-09T14:23:47+5:302025-09-09T15:17:27+5:30
पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर बालेन यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी सुरू झाली आहे.

कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
नेपाळमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरू झाला आहे. लाखो युवक रस्त्यावर उतरले आहेत. सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरू झालेल्या या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. या आंदोलनात २० हून अधिक युवकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने नेपाळमध्ये संसदेसह मंत्र्यांच्या घरांना लक्ष्य केले. या आंदोलनामुळे नेपाळमधील सरकार कोसळण्याचे संकट उभे राहिले आहे. त्यात पंतप्रधान केपी शर्मा ओली देश सोडण्याच्या तयारीत आहेत. नेपाळमधील या आंदोलनाला Gen Z असं नाव दिले आहे. या संपूर्ण घडामोडीत एक नाव प्रामुख्याने समोर आले ते म्हणजे बालेन शाह
बालेन शाह काठमांडूचे महापौर आहेत. बालेन नेपाळमधील युवकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे इतर लोकप्रतिनिधींहून ते वेगळे आहेत. याठिकाणचे बहुतांश महापौर त्यांच्या नगरपालिकांच्या पुढे फार काही लक्ष देत नाहीत. परंतु बालेन शाह नेपाळमधील या मोठ्या आंदोलनात केंद्रस्थानी आले आहेत. नेपाळ न्यूजनुसार, बालेनचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा प्रभाव यावरून अंदाज केला जातो, की टाइम मॅग्जिनमध्ये २०२३ साली १०० प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता. द न्यूयॉर्क टाइम्ससारख्या प्रतिष्ठित मिडिया संस्थांनीही त्यांची दखल घेतली आहे.
बालेन शाह यांची युवकांमध्ये मोठी क्रेझ आहे. कायम त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमुळे राष्ट्रीय पातळीवर वाद-विवाद उभे राहतात. त्यांच्या पोस्ट वेगाने ट्रेंड होतात. बालेन यांची जीवनशैली, राहण्याची स्टाईल सर्वकाही तिथल्या युवकांसाठी एक रोल मॉडेल आहे. त्यामुळेच नेपाळमधील या आंदोलनाला पाठिंबा देत बालेन यांनी सहजपणे हे आंदोलन हायजॅक केले. बालेन शाह यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात सिव्हिल इंजिनिअर म्हणून केली. त्यानंतर रॅपर म्हणूनही त्यांची नशीब आजमावलं. बालेन शाह यांनी राजकारणात प्रवेश करताच काठमांडू येथील मेयर पदाची निवडणूक लढवली आणि जिंकली. युवकांमध्ये लोकप्रियता, त्याच त्याच राजकीय पक्षांना कंटाळलेले नेपाळी युवक यांनी बालेन शाह यांना तिथे नायक बनवले.
भारतीय सिनेमाला केला होता विरोध
२०२३ साली रामायणावर आधारित आदिपुरुष सिनेमा आला होता. त्यावेळी काठमांडूचे मेयर बालेन शाह यांनी या सिनेमातील काही संवादावर आक्षेप घेतला आणि ती वाक्य सिनेमातून हटवण्याची मागणी केली होती. जर सिनेमा निर्मात्यांनी असे केले नाही तर नेपाळ आणि काठमांडू येथे भारतीय सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराही बालेन शाह यांनी दिला होता.
आंदोलनाचं केंद्रबिंदू कसे बनले?
नेपाळमध्ये राजकीय नेत्यांच्या मुलांची हायप्रोफाईल जीवनशैलीविरोधात सोशल मीडियात #Nepokid ट्रेंड करू लागला. त्यानंतर सरकारने इंटरनेट आणि सोशल मीडियावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जेन झेड आंदोलन सुरू झाले. देशात शांततेत सुरू असणाऱ्या या आंदोलनावर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. पोलीस कारवाईत २० हून अधिक आंदोलनकर्ते मारले गेले. त्यामुळे युवकांमध्ये असंतोष पसरला. बालेन शाह यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे हिरो म्हणून ते आंदोलनात पुढे आले.
दरम्यान, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर बालेन यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी सुरू झाली आहे. गृह मंत्री रमेश लेखक यांनी आंदोलनकर्त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा राजीनामा सुपूर्द केला आहे. आतापर्यंत ३ मंत्र्यांनी राजीनामा दिला. केपी शर्मा ओली देश सोडण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी आंदोलनकर्ते बालेन शाह यांची तुलना थेट पंतप्रधानांसोबत करत आहेत. त्यांनी मेयरपदाचा राजीनामा देऊन देशाचे नेतृत्व करावे असा आग्रह आंदोलक युवक करत आहेत. फेसबुकवर नेपाळी युवक बालेन यांच्याकडे नवीन राजकीय पक्ष बनवून देशाचे नेतृत्व करावे असं आवाहन करत आहेत.