जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:52 IST2025-09-08T16:25:42+5:302025-09-08T18:52:09+5:30

नेपाळमध्ये पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झडप झाली आहे. या कारवाईत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. संसद भवनाबाहेर गोळीबार झाला.

Nepal: Protest turned violent in Kathmandu as people staged a massive protest outside Kathmandu Parliament, 9 dead, 80 injured in firing so far | जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

नेपाळची राजधानी काठमांडू येथे मोठ्या संख्येने युवक रस्त्यावर उतरले आहेत. याठिकाणी Gen-Z युवक आणि युवती रस्त्यावर निदर्शने करत आहेत. या आक्रमक आंदोलनकर्त्यांनी नेपाळच्या संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचे फवारे उडवले आणि काही ठिकाणी गोळीबारही केल्याचं समोर आले आहे. नेपाळमध्ये सोशल मिडिया बॅन केल्याविरोधात हा आवाज उचलण्यात आला आहे. यामुळे काठमांडू भागात कर्फ्यू लावला असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 

नेपाळमध्ये पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झडप झाली आहे. या कारवाईत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. संसद भवनाबाहेर गोळीबार झाला. त्यात बऱ्याच आंदोलनकर्त्यांना गोळी लागली. आतापर्यंत या आंदोलनात ८० हून अधिक जखमी झाले आहेत. काठमांडू प्रशासनाने तोडफोड करणाऱ्यांना दिसताच गोळी मारण्याचे आदेश दिले आहेत. काठमांडूच्या न्यू बानेश्वर येथे असलेल्या संसद भवनाजवळ मोठा जमाव जमला होता. त्यात आक्रमक आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. 

नेपाळमधील या आंदोलनामागचं मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियावर लादलेली बंदी. नेपाळच्या रस्त्यांवर हजारो तरुण दिसत आहेत. हे लोक भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात निदर्शने करत आहेत. नेपाळमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि स्नॅपचॅटवर बंदी घालण्यात आली आहे, ज्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड संताप आहे. हे आंदोलनकर्ते हिंसक झाल्यानंतर रस्त्यावर पोलिसांसह सैन्यानेही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे आंदोलन हिंसक बनले असा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. 

भारतीय सीमेवर सुरक्षा वाढवली

नेपाळमधील सध्याची परिस्थिती पाहता भारत-नेपाळ सीमेवर दक्षता वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसएसबीने भारत-नेपाळ सीमेवर दक्षता वाढवली आहे. एसएसबीने अतिरिक्त सैन्य आणि देखरेख देखील वाढवली आहे. नेपाळमध्ये नवीन पिढी रस्त्यावर उतरल्याने परिस्थिती जास्तच चिघळली आहे. ज्याप्रकारे आंदोलन होत आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या नेपाळमधील परिस्थितीवर पंतप्रधान केपी ओली यांनी तातडीची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. 

Web Title: Nepal: Protest turned violent in Kathmandu as people staged a massive protest outside Kathmandu Parliament, 9 dead, 80 injured in firing so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.