'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 22:53 IST2025-09-10T22:52:30+5:302025-09-10T22:53:02+5:30
Nepal Gen Z protest: नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापनेच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत.

'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
Nepal Gen Z protest:नेपाळमधील सत्तापालटानंतर माजी पंतप्रधान केपी ओली यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ओली यांनी Gen-Z आंदोलकांना एक लेखी संदेश पाठवला आहे. निदर्शनांदरम्यान पोलिसांच्या गोळीबारात प्राण गमावलेल्या तरुणांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच, "सरकारी कार्यालयांमध्ये झालेली जाळपोळ आणि तोडफोडीची घटना अचानक घडलेली नाही. तुमच्या निष्पाप चेहऱ्यांचा वापर दिशाभूल करण्यासाठी केला जातोय," असा दावा ओली यांनी केला.
लिपुलेखवरील जुन्या भूमिकेचा पुनरुच्चार
काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, केपी ओली यांनी पुन्हा एकदा लिपुलेख, कलापाणी आणि लिंपियाधुरावरील नेपाळच्या दाव्यासह राष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, नागरिकांना बोलण्याचा, हालचाल करण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार देणाऱ्या लोकशाहीचे रक्षण करणे, हे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट राहिले आहे. १९९४ मध्ये गृहमंत्री म्हणून त्यांच्या कारकिर्दीची आठवण करून देताना केपी ओली म्हणाले की, त्यांच्या काळात एकही गोळी चालली नाही आणि ते नेहमीच शांततेच्या बाजूने राहिले आहेत.
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापनेचे प्रयत्न
केपी ओली यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापनेचा प्रयत्न तीव्र झाला आहे. सोमवारी (८ सप्टेंबर २०२५) Gen-Z आदोंलनात ३० लोकांचा मृत्यू झाला आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव आता अंतरिम पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. काठमांडूचे महापौर बालेन यांनीही सुशीला कार्की यांना पाठिंबा दिला आहे.