PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:32 IST2025-09-09T14:31:06+5:302025-09-09T14:32:22+5:30
PM KP Sharma Oli Resigns: नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केपी शर्मा ओली देश सोडून पळाल्याचा दावा केला जातोय.

PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
Nepal Gen-Z Protest : नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया अॅप्सवरील बंदीविरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले. गेल्या दोन दिवसांपासून राजधानी काठमांडूसह देशभरात हिंसक निदर्शने सुरू आहेत. अनेक शहरांमध्ये तरुणांकडून तोडफोड आणि जाळपोळ केली जात आहे. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या खासगी निवासस्थानाला पेटवून दिले. या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर नेपाळचेपंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns amid violent protests in Kathmandu over alleged corruption. pic.twitter.com/6VbW7AGidY
— ANI (@ANI) September 9, 2025
पंतप्रधानांपूर्वी देशाचे गृहमंत्री रमेश लेखक, परराष्ट्र मंत्री डॉ. आरजू राणा देउबा, दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग आणि ऊर्जा मंत्री दीपक खड़का यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आंदोलकांनी या सर्व मंत्र्यांची घरेही पेटवून दिली.
नेपाळमध्ये हिंसक निदर्शने
नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर देशातील तरुणाई संतापली अन् थेट आंदोलन सुरू केले. निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक संघर्ष सुरू झाला. तरुणांनी संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा दलांनी बळाचा वापर करून परिसरात कर्फ्यू लावला. या घटनेत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. गोंधळ वाढल्यानंतर सरकारने सोशल मीडियावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला, मात्र तरुणांनी आपली निदर्शने सुरुच ठेवली.
निदर्शकांनी राष्ट्रपती पौडेल यांच्या वैयक्तिक निवासस्थानाला आग लावली आहे. तसेच, पंतप्रधान केपी ओली यांच्या वैयक्तिक निवासस्थानावरही जाळपोळ करण्यात आली आहे. याशिवाय, ललितपूरमधील माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल 'प्रचंड' यांच्या निवासस्थानाचीही तोडफोड आणि माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली.
पंतप्रधान केपी ओली देश सोडून पळाले?
नेपाळमध्ये संसदेत घुसलेल्या निदर्शकांनी सैन्याची शस्त्रे हिसकावली. तसेच, अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना बेदम मारहाण केली.या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काठमांडू विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली असून, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन येणारी सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान, या सर्व हिंसाचारामुळे पंतप्रधान केपी ओली देश सोडून पळाल्याचा दावा नेपाळी वृत्त वाहिन्या करत आहेत.