ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:48 IST2025-09-11T12:42:25+5:302025-09-11T12:48:10+5:30
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांनी चीन किंवा दुबईची शरण घेतली असावी, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, आता ते नेमके कुठे लपून बसले आहेत, याची माहिती समोर आली आहे.

ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
नेपाळमधील 'जेन झी' आंदोलन आता काहीस थंड झालं असलं, तरी अजून तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. या आंदोलनामुळे देशात सत्तापालट झाली आहे. या आंदोलनाची तीव्रता इतकी होती की, संपूर्ण मंत्रीमंडळाला राजीनामा द्यावा लागला. इतकंच काय तर, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली. गेल्या २ दिवसांपासून अनेक मंत्र्यांना 'जेन-झी' आंदोलनकर्त्यांचा मारही खावा लागला. मात्र, या दरम्यान पंतप्रधान कुठेच दिसले नाहीत. नेपाळचे पंतप्रधान देश सोडून पळून गेले, असा कयास लोकांनी बांधला होता. मात्र, ते नेमके कुठे गेले याची माहिती कुणालाच नाही.
माजी पंतप्रधान ओली यांनी चीन किंवा दुबईची शरण घेतली असावी, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, आता ते नेमके कुठे लपून बसले आहेत, याची माहिती समोर आली आहे. स्वत: केपी शर्मा ओली यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले आहे. यात त्यांनी सगळ्या चर्चांना स्वतः पूर्ण विराम देत आपण आता कुठे आहोत, हे सांगितले आहे.
कुठे आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान?
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे चीन किंवा दुबई नाही तर नेपाळमध्ये थांबले आहेत. नेपाळच्या शिवपुरी भागात कडक सुरक्षेत त्यांनी आश्रय घेतला आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेपाळी सेनेने घेतली आहे. केपी शर्मा ओली यांनी शेअर केलेल्या पत्रात तरुणांना आवाहन केले आहे. यात त्यांनी म्हटले की, सध्या ते सैनिकांच्या सुरक्षेत असून, या सगळ्या हल्लाकल्लोळात देखील त्यांना देशातील तरुणांची आणि लहान मुलांची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, लहान बाळांचं हसू आणि तरुणांचा स्नेह मला रोमांचित करत राहील.
काय म्हणाले केपी शर्मा ओली?
या आंदोलनाबद्दल आपलं मत मांडताना मनातील वेदना देखील व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले की, देश सांभाळताना परिवर्तनाच्या लढाईत मी स्वतः अपत्य सुखापासून वंचित राहिलो. मात्र, बाबा बनण्याची माझी ओढ कधीच कमी झाली नाही. यावेळी त्यांनी लोकांना याचीही आठवण करून दिली, जेव्हा ते नेपाळ गृहमंत्री होते, त्या काळात देशात एकही गोळी चालली नव्हती.
सध्या देशात सुरू असलेले 'जेन-झी' आंदोलन हा तरुणांचा खरा आवाज नसून, ते मोठं षडयंत्र असल्याचे, त्यांनी म्हटले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये आग लावणे, तुरुंगातून कैद्यांना मुक्त करणे, हे एखाद्या आनंदोलनाचा भाग असूच शकत नाही. जी लोकशाही व्यवस्था संघर्ष आणि बलिदान देऊन मिळवली आहे, आज तीच व्यवस्था संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे, त्यांनी म्हटले.