११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:59 IST2025-12-12T11:59:04+5:302025-12-12T11:59:17+5:30
NASA MAVEN Loss of Contact : सप्टेंबर २०१४ मध्ये मंगळाच्या कक्षेत पोहोचलेल्या MAVEN चे मुख्य काम मंगळावरचे वातावरण आणि सौर वाऱ्यांमधील क्रियाकलाप समजून घेणे होते.

११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'च्या महत्त्वाकांक्षी 'MAVEN' मार्स ऑर्बिटर मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. २०१३ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेल्या आणि गेल्या ११ वर्षांपासून मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या या यानाशी ६ डिसेंबर २०२५ रोजी अचानक संपर्क तुटला आहे.
नासाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, MAVEN ऑर्बिटर मंगळ ग्रहाच्या मागे जात असताना पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाचा यानाशी संपर्क तुटला. ग्रहामागे जाण्यापूर्वी यानाचे सर्व छोटे सिस्टम व्यवस्थित कार्यरत होते, पण ग्रहामागे निघाल्यावर डीप स्पेस नेटवर्कला कोणताही सिग्नल मिळाला नाही. या अनपेक्षित घटनेमुळे नासाच्या वैज्ञानिकांची चिंता वाढली आहे.
MAVEN चे योगदान
सप्टेंबर २०१४ मध्ये मंगळाच्या कक्षेत पोहोचलेल्या MAVEN चे मुख्य काम मंगळावरचे वातावरण आणि सौर वाऱ्यांमधील क्रियाकलाप समजून घेणे होते. MAVEN कडून मिळालेल्या माहितीमुळेच मंगळ ग्रहाने आपले वातावरण आणि पाणी सौर वाऱ्यांच्या प्रभावामुळे कसे गमावले आणि तो कोरडा व थंड का झाला, हे समजण्यास मोठी मदत मिळाली होती. नासा सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, हरवलेला सिग्नल परत मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.