"आम्ही त्यांना परत घेतोय, पण…’’, ट्रम्प यांच्यासमोरच अमेरिकेतून हाकललेल्या भारतीयांबाबत मोदींचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 09:03 IST2025-02-14T09:02:47+5:302025-02-14T09:03:13+5:30
Narendra Modi-Donald Trump Meeting : हा प्रश्न केवळ भारताचा नाही आहे. जागतिक दृष्टीकोनातून पाहिल्यास जे लोक बेकायदेशीररीत्या एखाद्या देशात राहतात, त्यांना तिथे राहण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.

"आम्ही त्यांना परत घेतोय, पण…’’, ट्रम्प यांच्यासमोरच अमेरिकेतून हाकललेल्या भारतीयांबाबत मोदींचं मोठं विधान
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर देशात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना अमेरिकेतून हाकलण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेंतर्गत अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या १०० भारतीयांनाही अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आले होते. या नागरिकांना माघारी धाडताना अमेरिकेने दिलेल्या वागणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत घेतलेल्या संयक्त पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने विचारणा केली असता नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना परत घेत आहोत. मात्र आमच्यासाठी ही गोष्ट इथेच थांबत नाही, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच मोदींनी सांगितले की, हा प्रश्न केवळ भारताचा नाही आहे. जागतिक दृष्टीकोनातून पाहिल्यास जे लोक बेकायदेशीररीत्या एखाद्या देशात राहतात, त्यांना तिथे राहण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आता भारत आणि अमेरिकेबाबत बोलायचं झाल्यास जो खरा भारतीय नागरिक असेल आणि तो अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असेल, तर त्याला परत घेण्यास भारत तयार आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. या विधानाच्या माध्यातून मोदींनी भारतात. बेकायदेशीररीत्या राहणारे बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मोदी पुढे म्हणाले की, हे लोक सामान्य कुटुंबातील मुलं असतात. त्यांना मोठमोठी स्वप्नं दाखवली जातात. बहुतांश लोकांना दिशाभूल करून आणलं जातं. त्यामुळे मानव तस्करीमध्ये गुंतलेल्या या संपूर्ण इको सिस्टिमवर वार करण्याची आवश्यकता आहे. मानव तस्करी बंद करण्यासाठी या प्रकारच्या इकोसिस्टिमला संपवण्यासाठी भारत आणि अमेरिका मिळून प्रयत्न करत आहेत.
गरीब लोक आपली धनदौलत विकून येतात. त्यांना स्वप्न दाखवली जातात. हा त्यांच्यावरही होणारा अन्याय आहे. या पूर्ण इकोस्टिस्टिमविरोधात आमची लढाई सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प हेसुद्धा या इकोसिस्टिमला पराभूत करण्याच्या लढाईत भारताला मदत करतील, असा मला विश्वास आहे, असेही मोदींनी शेवटी सांगितले.