पाकिस्तानविरोधात लढाई, भारताकडे मागितली मदत; कोण आहेत निर्वासित बलूचिस्तानच्या पंतप्रधान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:58 IST2025-03-17T15:55:51+5:302025-03-17T15:58:49+5:30

नायला या सातत्याने भारत दौरा करतात. २०१६ मध्ये त्या भारतात आल्या होत्या. हे तेच वर्ष होते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलूचिस्तानचा मुद्दा १५ ऑगस्टच्या त्यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणात उचलला होता.

Naela Quadri Baloch: Who is the exiled Prime Minister of Balochistan?; Struggling against Pakistan | पाकिस्तानविरोधात लढाई, भारताकडे मागितली मदत; कोण आहेत निर्वासित बलूचिस्तानच्या पंतप्रधान?

पाकिस्तानविरोधात लढाई, भारताकडे मागितली मदत; कोण आहेत निर्वासित बलूचिस्तानच्या पंतप्रधान?

बलूच लिबरेशन आर्मीने अलीकडच्या काळात पाकिस्तानवर आक्रमक हल्ले सुरूच ठेवले आहेत. ट्रेन हायजॅकपासून स्फोटापर्यंत बलूचिस्ताननं पाकिस्तानची डोकेदुखी वाढवली आहे. त्यातच दीर्घ काळापासून बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारी नायला कादरी बलोच यांनी पाकिस्तानला फटकारलं आहे. बलूचिस्तान हा कधीकाळी स्वतंत्र देश होता, त्यावर आता पाकिस्तानचा अवैध कब्जा आहे असा तिने दावा करत बलोच लोकांविरोधात मानवाधिकार उल्लंघन, संसाधनाची लूट आणि हत्येचा आरोप पाकिस्तान सरकारवर करत आहे.

स्वतंत्र बलूचिस्तानचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. नायला कादरी बलोच यांनी निर्वासित बलोच सरकारची स्थापना केली आहे. त्या स्वत: बलोच सरकारच्या पंतप्रधान आहेत, ज्याची स्थापना २१ मार्च २०२२ रोजी युरोपात केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे ठिकाण सार्वजनिक केले नाही. त्या सध्या कॅनडात राहत असल्याचं सांगितले जाते. नायला बलूचिस्तानच्या स्वातंत्र्येसाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळावं यासाठी अनेक देशांचा दौरा करतात. त्यांनी विशेषत: भारताकडे मदतीचं आवाहन केले आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात बलूचिस्तानचा मुद्दा उचलून धरण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नायला यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार यांच्याकडे यूएनमध्ये बलूचिस्तानच्या समर्थनात उभं राहण्याची संधी आहे. जी कदाचित उद्या नसेल. नरेंद्र मोदींना बलूचिस्तानातील लोक नायक म्हणून पाहतात. जर भारताने UN मध्ये बलूचिस्तानचं समर्थन केले तर स्वतंत्र बलूचिस्तान भविष्यात भारताचं समर्थन करेल. भारत आणि बलूचिस्तान यांच्यात खूप साम्य आहे. या दोन्ही देशांना धर्माच्या नावावर अन्याय केला गेला असंही त्यांनी सांगितले. परंतु भारत सरकारने अद्याप बलूचिस्तान निर्वासित सरकारला मान्यता दिली नाही.

नायला या सातत्याने भारत दौरा करतात. २०१६ मध्ये त्या भारतात आल्या होत्या. हे तेच वर्ष होते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलूचिस्तानचा मुद्दा १५ ऑगस्टच्या त्यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणात उचलला होता. त्यानंतर २०२३ आणि २०२४ मध्येही नायला भारतात आल्या होत्या. बलूचिस्तानमध्ये खूप वाईट परिस्थिती आहे.  पाकिस्तानी सैन्य बलूच लोकांच्या घराला आग लावत आहे. आमच्या बागा, शेती पेटवत आहे असं नायला यांनी भारतात आल्यावर म्हटलं होते. 

कोण आहेत नायला कादरी बलोच?

नायला कादरी बलोच यांचा जन्म १८ जुलै १९६५ साली पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात झाला होता. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर समाजात महिलांची स्थिती आणि अधिकारांबाबत संघर्ष केला. कबीलाई संस्कृती असणाऱ्या बलूचिस्तानात महिलांच्या हक्काकडे कायम दुर्लक्ष केले जाते. बलूचिस्तानची संस्कृती, भाषा यांना नायला यांनी प्राधान्य दिले आहे. बलूच समुदायाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख कायम सुरक्षित राहावी यासाठी नायला संघर्ष करत आहेत. 
 

Web Title: Naela Quadri Baloch: Who is the exiled Prime Minister of Balochistan?; Struggling against Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.