म्यानम्यार भूकंपातील मृतांची संख्या २७०० वर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेचे प्राण वाचविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 06:29 IST2025-04-02T06:29:10+5:302025-04-02T06:29:50+5:30
Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपामुळे मरण पावलेल्यांचा आकडा मंगळवारी २७००वर पोहोचला आहे. त्या देशातील अस्थिर राजकीय स्थितीमुळे तिथे भूकंपग्रस्तांसाठी बचावकार्य करण्यात अडथळे येत आहेत.

म्यानम्यार भूकंपातील मृतांची संख्या २७०० वर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेचे प्राण वाचविले
बँकॉक - म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपामुळे मरण पावलेल्यांचा आकडा मंगळवारी २७००वर पोहोचला आहे. त्या देशातील अस्थिर राजकीय स्थितीमुळे तिथे भूकंपग्रस्तांसाठी बचावकार्य करण्यात अडथळे येत आहेत. तिथे एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे ९१ तास अडकून पडलेल्या महिलेचे प्राण वाचविण्यात मदतपथकांना यश आले आहे.
भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह आढळल्याने मृतांच्या संख्येत दररोज भर पडत आहे. म्यानमारचे लष्करशहा जनरल मिन आंग हाईंग यांनी सांगितले की, भूकंपातील मृतांची संख्या २७१९पर्यंत पोहोचली असून, ४५२१ जण जखमी झाले, तर ४४१ लोक अद्याप बेपत्ता आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, म्यानमारमध्ये भूकंपाने १० हजारहून अधिक इमारती कोसळल्या किंवा त्यांचे मोठे नुकसान झाले
एनडीआरएफने १४ मृतदेह बाहेर काढले
म्यानमारमध्ये बचावकार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाने इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढले आहेत. मंडाले शहरातील एका भागात तेरा इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम या पथकाकडे सोपविण्यात आले आहे. २८ मार्च रोजी म्यानमारमध्ये भीषण भूकंपामुळे झालेल्या मोठ्या हानीची छायाचित्रे भारताच्या कार्टोसॅट-३ या उपग्रहाने टिपली आहेत. मंडाले, सागाईंग या भागाची ही छायाचित्रे आहेत. त्यात भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.