२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 22:42 IST2025-10-24T22:42:24+5:302025-10-24T22:42:56+5:30
मुशर्रफ यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानी लष्कराला अल कायदाची अजिबात चिंता नव्हती, त्यांना फक्त भारताचीच चिंता होती असा दावाही माजी सीआयए एजेंटने केला.

२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली - पाकिस्तानचे माजी जनरल परवेझ मुशर्रफ यांच्याबद्दल एका माजी सीआयए एजंटने धक्कादायक खुलासे केले आहेत. मुशर्रफ अमेरिकेला दाखवायचे की, भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी काम करत आहेत मात्र ते स्वतः भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत होते असं त्यांनी म्हटलं आहे.
माजी सीआयए एजंट जॉन किरियाकौ यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अमेरिकेने पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक अब्दुल कादीर खान यांना मारण्याचा प्रयत्न केला नाही. हे सौदी सरकारच्या थेट हस्तक्षेपामुळे घडले. अमेरिकेकडे खान यांच्याबद्दल सर्व माहिती होती परंतु सौदी अरेबियाच्या विनंतीवरून त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला असा खुलासा त्यांनी केला.
सौदी सरकारचा पाकिस्तानला पाठिंबा
तसेच माझा एक सहकारी अब्दुल कादीरसोबत काम करत होता. जर आम्ही इस्रायलसारखी पद्धत स्वीकारली असती तर आम्ही त्याला मारले असते. त्याला शोधणे सोपे होते कारण तो कुठे राहत होता हे आम्हाला माहित होते. ते त्याचे दिवस कसे घालवायचे हे आम्हाला माहित होते. पण त्याला सौदी सरकारचा पाठिंबा होता असा दावा माजी सीआयए एजेंटने केला. सौदीच्या राजनैतिक दबावामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठी चूक झाली. ही तत्कालीन अमेरिकन सरकारची मोठी चूक होती. सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीसोबत काम करताना सीआयए आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेतील अनेक अधिकाऱ्यांनी पुष्टी करत हाईट हाऊसने खान यांना लक्ष्य करण्याविरुद्ध निर्देश दिले होते हे मला कळले होते असंही त्याने म्हटलं.
२००२ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध होणार होते
जॉन किरियाकौ यांनी भारताबद्दल एक दावाही केला. २००२ मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर होते. २००१ मध्ये भारतीय संसदेवर हल्ला झाला होता. त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालीन जनरल परवेझ मुशर्रफ यांनी अमेरिकेशी मैत्री असल्याचे भासवले आणि भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी काम करत असल्याचा दावा केला होता मात्र ते स्वतः भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत होते. मुशर्रफ यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानी लष्कराला अल कायदाची अजिबात चिंता नव्हती, त्यांना फक्त भारताचीच चिंता होती असा दावाही माजी सीआयए एजेंटने केला.