व्लादिमीर पुतिन यांना मोठा धक्का; राजधानी मॉस्कोत झालेल्या बॉम्ब स्फोटात रशियन जनरलचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 14:01 IST2025-12-22T14:01:10+5:302025-12-22T14:01:28+5:30
Moscow Bomb Blast: या घटनेमुळे रशियाची अंतर्गत सुरक्षा आणि गुप्तचर व्यवस्था यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

व्लादिमीर पुतिन यांना मोठा धक्का; राजधानी मॉस्कोत झालेल्या बॉम्ब स्फोटात रशियन जनरलचा मृत्यू
Moscow Bomb Blast: युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठा धक्का बसला आहे. मॉस्कोमध्ये झालेल्या संशयित कार बॉम्ब स्फोटात रशियन लष्कराचे वरिष्ठ लेफ्टनंट जनरल फानिल सरवारोव यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवार(22 डिसेंबर 2025) रोजी घडली.
महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते सरवारोव
लेफ्टनंट जनरल फानिल सरवारोव हे रशियन सशस्त्र दलांतील अत्यंत महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. ते डिपार्टमेंट ऑफ ऑपरेशनल ट्रेनिंगचे प्रमुख होते. या विभागाकडे लष्कराची रणनीतिक प्रशिक्षण व्यवस्था आणि युद्ध सज्जतेची जबाबदारी असते. त्यामुळे हा विभाग थेट रशियाच्या संरक्षण धोरण आणि युद्ध क्षमतेशी संबंधित मानला जातो. सरवारोव यांची भूमिका त्यामुळेच अत्यंत संवेदनशील आणि रणनीतिक होती.
कार पार्किंगमध्ये झाला स्फोट
BBC ने रशियन माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका अपार्टमेंट इमारतीजवळील कार पार्किंगमध्ये झाला. प्राथमिक तपासात हा कार बॉम्ब हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यामागे युक्रेनच्या गुप्तचर संस्थेचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप युक्रेन सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
स्फोटावेळी कारमध्येच होते जनरल
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, स्फोट झाला त्या वेळी लेफ्टनंट जनरल सरवारोव आपल्या कारमध्येच उपस्थित होते. स्फोट इतका तीव्र होता की, त्यांच्या शरीरात अनेक छर्रे घुसले आणि चेहऱ्याच्या हाडांना गंभीर इजा झाली. या गंभीर जखमांमुळे त्यांना वाचवता आले नाही आणि त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडले.
पुतिन सरकारसाठी गंभीर इशारा
रशियाच्या राजधानीतच लष्कराच्या इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या होणे ही सुरक्षा यंत्रणेतील मोठी चूक मानली जात आहे. युक्रेन युद्ध सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे रशियाची अंतर्गत सुरक्षा आणि गुप्तचर व्यवस्था यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, या हल्ल्यामुळे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर राजकीय आणि लष्करी दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
तपास सुरू
या प्रकरणाचा तपास रशियन तपास यंत्रणांकडून वेगाने सुरू असून, हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. ही घटना रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत गंभीर मानली जात आहे.