डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी पैशांचा पाऊस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 09:43 IST2025-01-15T09:42:58+5:302025-01-15T09:43:33+5:30
Donald Trump : या उद्योगपतींनी आतापर्यंतचा रेकाॅर्ड ब्रेक म्हणजे १७ कोटी अमेरिकन डॉलर्सचा निधी या सोहळ्यासाठी दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी पैशांचा पाऊस!
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी काही दिवसांवर आला आहे. २० जानेवारी रोजी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याकडे खुद्द ट्रम्प यांच्यासह अख्ख्या जगाचं लक्ष लागलं आहे. यंदा या सोहळ्यासाठी जगभरातून मोठमोठे नेते आणि उद्योगपती हजेरी लावणार आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी अमेरिकन उद्योगपतींनी आपली तिजोरी अक्षरश: मोकळी सोडली आहे.
या उद्योगपतींनी आतापर्यंतचा रेकाॅर्ड ब्रेक म्हणजे १७ कोटी अमेरिकन डॉलर्सचा निधी या सोहळ्यासाठी दिला आहे. प्रत्यक्ष शपथविधीपर्यंत त्यात आणखी बरीच भर पडणार आहे. हा निधी २० कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षाही जास्त होईल असा अंदाज आहे. जमा झालेल्या निधीच्या संदर्भात काम करणाऱ्या एका जाणकार अधिकाऱ्यानंच ही माहिती दिली. अर्थात, ही माहिती सार्वजनिक करण्याला परवानगी नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी गोळा झाल्यामुळे सारेच आश्चर्यचकित झाले आहेत.
मावळते राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथविधी समारंभासाठी जो निधी गोळा झाला होता, त्यापेक्षा यंदाचा निधी तब्बल तिप्पट आहे. ज्यो बायडेन यांना केवळ सहा कोटी अमेरिकन डॉलर्स निधी मिळाला होता. ट्रम्प आपल्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात, त्यांच्या आजपर्यंतच्या सर्वच कारकिर्दीत आणि यंदाही प्रत्यक्ष मतदानापर्यंत किती वादग्रस्त ठरले होते, हे साऱ्यांनाच माहीत आहे, पण यंदा त्यांना जो निधी मिळाला, त्यावरून त्यांच्या लोकप्रियतेचाही अंदाज येतो.
उद्योगपती आणि इतरांनी दिलेला हा जो निधी गोळा होतो, तो मुख्यत: शपथग्रहण कार्यक्रमांशी संबंधित जे इतर उपक्रम असतात, त्यासाठी जी परेड केली जाते, त्यासाठी खर्च केला जातो. हा पैसा नेमका कसा आणि कोणत्या कामांसाठी खर्च करायचा याची योजना निधी समितीनं तयार केली आहे आणि अजूनही त्यावर काम चालू आहे. या सोहळ्यासाठी आपल्यालाही उपस्थित राहाता यावं यासाठी अमेरिकेतील उद्योगपती प्रयत्नशील असतात. त्यांना त्याची फारच आस असते. त्यामुळेच ते त्यासाठी भरभरून निधीही देत असतात. खरं तर परंपरा अशी आहे की अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील नेत्यांना आमंत्रित केलं जात नाही, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी यंदा ही परंपरा मोडली आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांच्यासह इटलीच्या पंपतप्रधान जॉर्जिया मेलोनी, अल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले, अर्जेंटिनचेा राष्ट्राध्यक्ष जेवियर माइली.. इत्यादि अनेकांना डोनाल्ड ट्रम्प यांनी वैयक्तिक आमंत्रण पाठवले आहे. अर्थातच, भारतालाही विशेष आमंत्रण आहेच. सोहळ्यासाठी भारतातर्फे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सामील होण्याची शक्यता आहे. चीनतर्फेही राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याऐवजी उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग किंवा परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यापैकी कोणाला तरी पाठवलं जाऊ शकतं. या सोहळ्यासाठी अमेरिकेतील महत्त्वाचे नेते, उद्योगपती यांना व्हीआयपी पास दिले जातात. पण यंदा हे पासही बऱ्याच आधी संपले आहेत. ज्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला, अशा उद्योगपतींना देण्यासाठीही पास शिल्लक राहिलेले नाहीत.