वॉशिंग्टन - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात प्रथमच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. मात्र या संबोधनापूर्वी मोदी टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, या कार्यक्रमात मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प हे उपस्थित ५० हजारहून अधिक लोकांना संबोधित करणार आहेत. मेडिसन स्क्वेअर आणि सिलिकॉन व्हॉली येथील कार्यक्रमांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतील हा तिसरा सर्वात मोठा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही सहभागी होणार असल्याने हाऊडी मोदी हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार आहे. या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प हे सहभागी होणार असल्याच्या वृत्ताला व्हाइट हाऊसने दुजोरा दिला आहे. या कार्यक्रमामुळे भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होणार आहेत. दरम्यान, ह्युस्टनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध, व्यापार, संस्कृती यावर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प यांच्यासोबत अनेक मोठ्या व्यक्तीही सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच जगातील दोन देशांचे प्रमुख एकाच मंचावरून हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
ह्युस्टनमध्ये मोदी, ट्रम्प येणार साथ साथ, हजारोंच्या जनसमुदायाला करणार संबोधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 10:20 IST