रशियातील बेपत्ता विमान समुद्रात कोसळले, 28 जणांचा मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 12:19 IST2021-07-07T12:14:00+5:302021-07-07T12:19:21+5:30
Russian plane crashed in sea: डोंगराच्या टोकाला घर्षण झाल्यामुळे विमानाचा अपघात झाला

रशियातील बेपत्ता विमान समुद्रात कोसळले, 28 जणांचा मृत्यू झाला
मॉस्को: मंगळवारी रशियातून बेपत्ता झालेल्या विमानाचा आज शोध लागला आहे. हे विमान डोंगराच्या टोकाला घासून समुद्रात कोसळल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला असून, 22 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सचा मृतांमध्ये समावेश आहे. स्थानिक माध्यमांनी सांगितल्यानुसार, हे विमान रशियातील कामचाट्का प्रायद्वीपमधील पालना गावात उतरणार होते. पण, लँडींगपूर्वीच विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) सोबत संपर्क तुटला.
पंतप्रधानांचे चौकशीचे आदेश
An-26 नावाचे हे विमान कामचाट्का एविएशन इटरप्राइज कंपनीचे होते. विमानाने पेट्रोपावलोस्क-कामचाट्स्की शहरातून उड्डाण घेतली. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ओखोतस्कच्या समुद्रात हे विमान कोसळले. पालना शहरापासून 10 किलोमीटर दूर असताना विमानाचे मोठ्या डोंगराला घर्षण झाले आणि विमान समुद्रात कोसळले. रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिनने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
सोवियत संघातील विमान
मंगळवारी क्रॅश झालेले विमान ट्विन-इंजिन असलेले टर्बोप्रॉप विमान होते. हे विमान सिविलियन आणि मिल्ट्री ट्रांसपोर्टसाठी वापरले जायचे. या विमानाची डिजाइन आणि उत्पादन सोवियत संघात 1969 ते 1986 दरम्यान झाले आहे.