'एपस्टीन फाइल्स'मध्ये मीरा नायर यांचे नाव! जोहरान ममदानींच्या मातोश्री नक्की कशासाठी गेल्या होत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 12:43 IST2026-01-31T12:28:46+5:302026-01-31T12:43:01+5:30
'एपस्टीन फाइल्स'मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर यांचे नाव आल्याने चर्चा सुरु झाली आहे.

'एपस्टीन फाइल्स'मध्ये मीरा नायर यांचे नाव! जोहरान ममदानींच्या मातोश्री नक्की कशासाठी गेल्या होत्या?
Mira Nair: अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीचा आरोपी जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरणाने पुन्हा एकदा जागतिक राजकारण आणि मनोरंजन विश्वात खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी सार्वजनिक केलेल्या तब्बल ३० लाख पानांच्या एपस्टीन फाइल्समध्ये अनेक हाय-प्रोफाइल व्यक्तींची नावे समोर आली असून, यात प्रसिद्ध भारतीय-अमेरिकी चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या नावाचाही उल्लेख असल्याने अमेरिकेत चर्चेला उधाण आले आहे.
गिलेन मॅक्सवेलच्या घरात 'अमेलिया' चित्रपटाची पार्टी
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा २१ ऑक्टोबर २००९ च्या एका ईमेलमधून झाला आहे. प्रसिद्ध पब्लिसिस्ट पेगी सीगल यांनी जेफ्री एपस्टीनला पाठवलेल्या ईमेलनुसार, मीरा नायर यांच्या अमेलिया चित्रपटाच्या प्रीमियरनंतरची आफ्टरपार्टी एपस्टीनची जवळची सहकारी आणि दोषी गुन्हेगार गिलेन मॅक्सवेल हिच्या आलिशान टाउनहाऊसमध्ये आयोजित करण्यात आली होती.
सीगल यांनी पत्रात लिहिले आहे की, "मी आताच गिलेनच्या घरून निघाले, तिथे अमेलियाची पार्टी होती. त्या पार्टीला दिग्दर्शिका मीरा नायर यांच्यासह बिल क्लिंटन आणि जेफ बेझोस यांसारखी मोठी मंडळी उपस्थित होती."
बड्या हस्तींचे 'एपस्टीन नेटवर्क'शी संबंध?
सार्वजनिक झालेल्या या कागदपत्रांमध्ये केवळ मीरा नायरच नव्हे, तर जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींची नावे पुन्हा एकदा या प्रकरणाशी जोडली गेली आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, ऑस्कर विजेती अभिनेत्री हिलरी स्वँक यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, टेस्लाचे सीईओ मस्क आणि एपस्टीन यांच्यातील २०१२ चा संवादही उघड झाला आहे. एका ईमेलमध्ये मस्कने एपस्टीनला विचारले होते, "तुझ्या आयलंडवर सर्वात वाईल्ड पार्टी कोणत्या रात्री असेल?"
जोहरान ममदानी यांच्या अडचणी वाढणार?
हा खुलासा अशा वेळी झाला आहे जेव्हा मीरा नायर यांचा मुलगा जोहरान ममदानी हे न्यू यॉर्कचे महापौर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आईचे नाव अशा एका व्यक्तीच्या घराशी जोडले गेल्यामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.