'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:21 IST2026-04-11T08:59:38+5:302026-04-11T09:21:16+5:30
इराणच्या शिष्टमंडळाच्या विमानातील फोटोंमुळे अमेरिकेसोबतच्या चर्चेआधीच वातावरण तापले आहे.

'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
Iran Minab 168: इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आज पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये महत्त्वाची चर्चा होत आहे. मात्र, या चर्चेच्या टेबलावर बसण्यापूर्वीच इराणने मीनाब स्कूल हल्ल्याच्या जखमा ताज्या करत भावनिक आणि राजकीय दबाव निर्माण केला आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबफ हे जेव्हा इस्लामाबादमध्ये दाखल झाले, तेव्हा त्यांच्यासोबत अमेरिकन हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप मुलांच्या आठवणी आणि पुरावे देखील होते.
विमानात 'त्या' चिमुकल्यांसाठी राखीव जागा
गालिबफ यांनी विमानातून एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये गालिबफ विमानातील काही रिकाम्या जागांकडे पाहत आहेत. त्या जागांवर मीनाबच्या शजरे तय्येबा शाळेवरील हल्ल्यात मारल्या गेलेल्या मुलांचे फोटो, त्यांच्या रक्ताळलेल्या स्कूल बॅग आणि शूज ठेवले होते.
गालिबफ यांनी एक्सवर पोस्ट करताना म्हटले की, हे चिमुकले या प्रवासात माझे सोबती आहेत. यातून त्यांनी इराण हा नरसंहार विसरलेला नाही आणि चर्चेदरम्यान हा मुद्दा केंद्रस्थानी असेल स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
همراهان من در این پرواز#Minab168pic.twitter.com/xvXmDlSDiF
— محمدباقر قالیباف | MB Ghalibaf (@mb_ghalibaf) April 10, 2026
कसा झाला मीनाब हल्ला?
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणच्या होर्मोजगन प्रांतात अमेरिकेने टोमॅहॉक क्षेपणास्त्राने हल्ला केला होता. अमेरिकेचा दावा होता की त्यांनी रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या तळाला लक्ष्य केले, पण जुन्या गुप्त माहितीमुळे हे क्षेपणास्त्र शेजारच्या शाळेवर पडले. या भीषण घटनेत १६५ हून अधिक मुलांचा आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ट्रम्प यांनी हा इराणचा स्वतःचा बनाव असल्याचे म्हटले होते, तर इराणने याला अमेरिकेचा क्रूरपणा ठरवले आहे.
"चांगली नियत, पण विश्वास शून्य"; इराणची भूमिका
इस्लामाबादमध्ये उतरल्यानंतर गालिबफ यांनी इराणची भूमिका स्पष्ट केली. "आम्ही चांगल्या नियतीने चर्चेला आलो आहोत, पण आमचा अमेरिकेवर कोणताही विश्वास नाही. यापूर्वीचा अनुभव विश्वासघाताचाच आहे," असे त्यांनी ठणकावून सांगितले. इराणने चर्चेसाठी लेबनॉनमध्ये युद्धविराम लागू करणे आणि अमेरिकेने गोठवलेली इराणची मालमत्ता मुक्त करणे या दोन प्रमुख अटी ठेवल्या आहेत.
अमेरिकेचा इशारा कायम
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी चर्चेसाठी हात पुढे केला असला तरी सावध पवित्रा घेतला आहे. "जर इराण प्रामाणिकपणे चर्चा करणार असेल, तर आमचा हात मदतीसाठी तयार आहे. पण जर त्यांनी आमच्याशी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला, तर हे शिष्टमंडळ त्यांना दाद देणार नाही," असं जेडी व्हान्स म्हणाले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही इराण लष्करीदृष्ट्या पराभूत झाल्याचा दावा केला आहे.