लाखो कर्मचाऱ्यांचा पगार आता होणार; सरकारी कामेही सुरळीत सुरू राहणार, अमेरिकेत अखेर ४३ दिवसांनंतर शटडाउन संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:20 IST2025-11-14T10:20:39+5:302025-11-14T10:20:49+5:30
United State: सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधक डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यात तडजोड झाल्याने बुधवारी ४३ दिवसांनी अमेरिकेतील शटडाउन संपुष्टात आले. शटडाउन संपवण्याबाबत हाऊसमध्ये सादर करण्यात आलेले विधेयक २२२ विरुद्ध २०९ मतांनी संमत झाले.

लाखो कर्मचाऱ्यांचा पगार आता होणार; सरकारी कामेही सुरळीत सुरू राहणार, अमेरिकेत अखेर ४३ दिवसांनंतर शटडाउन संपुष्टात
वॉशिंग्टन - सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधक डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यात तडजोड झाल्याने बुधवारी ४३ दिवसांनी अमेरिकेतील शटडाउन संपुष्टात आले. शटडाउन संपवण्याबाबत हाऊसमध्ये सादर करण्यात आलेले विधेयक २२२ विरुद्ध २०९ मतांनी संमत झाले.
शटडाउनमुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचे सुमारे दीड महिने वेतन थांबले होते. आरोग्यासह पोषण आहारासारख्या अनेक सरकारी योजनांच्या निधीला कात्री लावली होती. हजारो गरीब नागरिकांना फूड स्टॅम्प मिळत नव्हते. अमेरिकेतील हवाई सेवा पूर्ण कोलमडण्याच्या अवस्थेत आली होती. आता सर्व वित्तीय तूट भरून काढण्यासाठी पुढील वर्षांसाठी सरकारने सर्व खात्यांना निधी पुरवण्याचे आश्वासन विरोधकांना द्यावे लागले. या तडजोडीत ट्रम्प प्रशासनाने ज्या कामगारांना नोकरीवरून काढले होते, त्यांनाही कामावर परत घेतले जाणार आहे.
‘ट्रेन अमेरिकन्स अँड गो बॅक’
विशिष्ट टॅलेंट असलेल्या परदेशी नागरिकांनी अमेरिकेत येऊन अमेरिकेच्या नागरिकांना कौशल्याची कामे पाच-सात वर्षे शिकवावीत मग आपल्या देशात परत जावे, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एच-वनबी व्हिसा समर्थनामागचा अर्थ असल्याचा युक्तिवाद ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेस्सेंट यांनी व्यक्त केला.
‘सेमी कंडक्टर उद्योग अमेरिकेत हवा’
बेस्सेंट म्हणाल्या, अमेरिकेत विशेष कौशल्य असलेले कर्मचारी नाहीत. अमेरिका सेमी कंडक्टर, जहाज बांधणी किंवा ज्यामध्ये अचूकता असते अशा वस्तूंचे २५-३० वर्षे उत्पादन करत नाही. त्यामुळे ट्रम्प यांना असे म्हणायचे आहे की, अमेरिकेतील कामगार एका रात्रीत जहाज वा क्षेपणास्त्रे वा चिप्स बनवू शकत नाही. त्याला ते काम आले पाहिजे, त्यासाठी त्याला तसे प्रशिक्षण घ्यावे लागेल. हे विशिष्ट टॅलेंट बाहेरून आम्हाला आणावे लागेल. आम्हाला देशात सेमी कंडक्टर उद्योग आणायचा आहे, असे बेस्सेंट म्हणाल्या.
विरोधकांवर ट्रम्प यांची टीका
शटडाउन संपल्यानंतर ट्रम्प यांनी विरोधकांनी आमच्याकडून खंडणी मागितली, पण आम्ही त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही. विरोधक अतिरेकीवादी आहे, त्यांना समस्या सहजासहजी सोडवायची नव्हती, असे आरोप केले.