पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:58 IST2025-07-20T13:57:04+5:302025-07-20T13:58:09+5:30
...या भीतीने पाकिस्तान सतर्क झाल्याचे दिसत आहे!

पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेली लष्कर-ए-तैयबाची आघाडीची संघटना 'द रेझिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) वर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. यानंतर, पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. आता भारत पुन्हा एअर स्ट्राइक तर करणार नाही ना? या भीतीने पाकिस्तान सतर्क झाल्याचे दिसत आहे. कारण, पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीत एक आठवड्यासाठी नोटम (NOTAM) जारी केला आहे.
पाकिस्तानी लष्काराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 से 23 जुलैपर्यंत सेंट्रल सेक्टरची हवाई हद्द पूर्णपणे बंद राहील. तसेच 22 आणि 23 जुलाईला दक्षिणी पाकिस्तानची हवाई सीमाही बंद राहणार आहे. मात्र, अधिकृतपणे या मागचे कारण, लष्करी सराव अथवा क्षेपणास्त्र परीक्षण सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात नुकतीच चिनी कार्गो विमानांची हालचाल दिसून आली आहे. यामुळे, चीनने पाकिस्तानला नवे लष्करी तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रे आणि एअर डिफेंस सिस्टिम पुरवल्याची शक्यताही बळावली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव -
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना टीआरएफचा सहभाग असल्याचे समोर आले. यानंतर प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले. यानंतर पाकिस्तानने भारतासाठी आपली हवाई सीमा बंद केली आहे. दोन्ही देशांमधील संवाद जवळजवळ थांबला आहे आणि सीमेवर सुरक्षा दलांची तैनाती वाढवली आहे, यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
'द रेझिस्टन्स फ्रंट'वर अमेरिकेने घातली बंदी -
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेली लष्कर-ए-तैयबाची आघाडीची संघटना असलेल्या 'द रेझिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) वर अमेरिकेने बंदी घातली आहे. ही संघटना लष्करची एक छुपी शाखा आहे, जी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी घटना घडवून आणत असते.