इराणच्या सिस्तान-बलूचिस्तानची राजधानी असलेल्या झाहेदानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच नागरिक आणि तीन हल्लेखोरांचा समावेश आहे.
इराणची सरकारी वृत्तसंस्था मिझान ऑनलाईनने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात बंदूकधार्यांनी झाहेदानमधील ज्युडिशियरी सेंटरला टार्गेट केलं. सकाळी न्यायालयीन कामकाज सामान्यपणे सुरू असताना हा हल्ला झाला.
घटनेनंतर सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत तिन्ही हल्लेखोरांना ठार मारलं. इराणची अधिकृत वृत्तसंस्था आयआरएनएनेही हल्ल्याची पुष्टी केली आहे आणि परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं म्हटलं आहे.
जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, परंतु हा परिसर दहशतवादी कारवाया आणि फुटीरतावादी हिंसाचाराचे केंद्र राहिला आहे.