आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 08:30 IST2025-12-29T08:29:50+5:302025-12-29T08:30:04+5:30
Mexico Train Accident : सुमारे २५० प्रवाशांना घेऊन जाणारी ही रेल्वे ओक्साका राज्यातील निजांडा शहराजवळून जात असताना एका भीषण वळणावर इंजिनसह अनेक डबे रुळावरून घसरले.

आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
वर्षाच्या शेवटाला काही दिवस शिल्लक असताना आज जगात दोन रेल्वे अपघात घडले आहेत. आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याने एका प्रवाशाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला, तर २४ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दुसरीकडे मेक्सिकोच्या दक्षिणेकडील ओक्साका प्रांतात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. 'इंटरओशनिक एक्स्प्रेस' रुळावरून घसरल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान १३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ९८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सुमारे २५० प्रवाशांना घेऊन जाणारी ही रेल्वे ओक्साका राज्यातील निजांडा शहराजवळून जात असताना एका भीषण वळणावर इंजिनसह अनेक डबे रुळावरून घसरले. हा परिसर दुर्गम असल्याने मदतकार्यात सुरुवातीला अडचणी आल्या. अपघाताच्या वेळी रेल्वेचा वेग प्रचंड असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
राष्ट्राध्यक्षांकडून शोक व्यक्त
मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबाम यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी नौदल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगवान करण्याचे आदेश दिले आहेत. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी ३६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
इंटरओशनिक कॉरिडॉरला मोठा धक्का
हा रेल्वे मार्ग मेक्सिकोसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. २०२३ मध्येच या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. हा मार्ग पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागराला जोडणारा एक महत्त्वाचा व्यापारी दुवा आहे. या अपघातानंतर मेक्सिकोच्या ॲटर्नी जनरल कार्यालयाने तांत्रिक बिघाड किंवा मानवी चूक या दिशेने तपास सुरू केला आहे.