मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 09:30 IST2025-11-16T09:29:07+5:302025-11-16T09:30:02+5:30
तरूणाईचे हे आंदोलन आता देशव्यापी होत असून नॅशनल पॅलेसवर चाल करून जात आहे.

मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
मेक्सिको सिटीमध्ये पुन्हा एकदा GenZ ने आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. देशातील वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, ड्रग्जशी संबंधित हिंसाचार आणि राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्या सुरक्षा धोरणांविरुद्ध ही निदर्शने सुरू आहेत. याविरोधात हजारो तरुण रस्त्यावर उतरले. जेन-झी तरूणांनी जोरदार निदर्शने केली. त्यानंतर विरोधी पक्षांच्या बड्या नेतेमंडळींनीही यात सहभाग घेतला. सप्टेंबरमध्ये नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीनंतर सर्वात मोठी जेन-झी निदर्शने झाली, ज्यामुळे त्या देशाच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. आता मेक्सिकोमध्ये अनेक तरुण भ्रष्टाचार आणि हिंसक गुन्ह्यांसाठी शिक्षामुक्ती यासारख्या मोठ्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे हे देशव्यापी आंदोलन सुरू झाले आहे.
राष्ट्रीय राजवाड्याबाहेर निषेध
मेक्सिको सिटीमधील नॅशनल पॅलेसच्या बाहेर आंदोलन जमले. तिथे शीनबॉम राहतात आणि त्यांचे कार्यालयही आहे. या पॅलेससाठीच्या संरक्षणासाठी उभारलेले काही बॅरिकेड्स आंदोलकांनी तोडले. कॅम्पसमध्ये सुरक्षा देणाऱ्या पोलिसांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि अग्निशामक यंत्रांचा वापर केला. काही आंदोलकांनी घोषणाबाजीही केली. "कार्लोस मांझोचे अशा प्रकारे संरक्षण करायला हवे होते," अशा घोषणा तरूणांनी दिल्या.
आंदोलकांची मागणी काय?
आम्हाला अधिक सुरक्षिततेची गरज आहे, असे व्यवसाय सल्लागार आंद्रेस मस्सा म्हणाले. निषेधात सामील झालेल्या डॉक्टर अरिझाबेथ गार्सिया म्हणाल्या की, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी अधिक निधी आणि चांगली सुरक्षा मिळावी या मागणीसाठी मोर्चा काढला जात आहे. देशातील व्यापक असुरक्षिततेचे बळी डॉक्टर देखील आहेत, जिथे कोणालाही मारले जाते आणि कुठलीही शिक्षा दिली जात नाही.
देशात सुरू असलेल्या GenZ आंदोलनाबाबत देशाचे अध्यक्ष शीनबॉम यांनी उजव्या विचारसरणीच्या पक्षांवर चळवळीत घुसखोरी करण्याचा आणि सोशल मीडियावरील बॉट्स वापरून गर्दी वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मिचोआकानच्या महापौरांच्या अलिकडेच झालेल्या हत्येनंतर शनिवारी देशभरात झालेल्या रॅलीत विविध वयोगटातील लोकांनी भाग घेतला. नुकत्याच हत्या झालेल्या मिचोआकानचे महापौर कार्लोस मांझो यांच्या समर्थकांनीही या निदर्शनात भाग घेतला.
कार्लोस मांझोच्या हत्येवरून वाद
ऑक्टोबर २०२४ पासून सत्तेत असलेल्या शीनबॉम यांनी त्यांच्या पहिल्या वर्षात ७० टक्क्यांहून अधिक लोकप्रियता रेटिंग कायम ठेवली, परंतु त्यांच्या सुरक्षा धोरणाबद्दल त्यांना टीकेचा सामना करावा लागला. विशेषतः मिचोआकान राज्यात झालेल्या हाय-प्रोफाइल हत्याकांडानंतर हा वाद उफाळला. आता आंदोलनात "आम्ही सारे कार्लोस मांझो" असे संदेश असलेले बॅनर आणि "वन पीस"मधील समुद्री चाच्यांचे झेंडे देखील दिसू लागले आहेत, जे जागतिक युवा चळवळींचे प्रतीक बनले आहे.