शनिवारी संध्याकाळी न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन ब्रीजला मॅक्सिकोच्या नौदलाचे जहाज धडकले. या जहाजात २७७ प्रवासी होते. या अपघातात आतापर्यंत १९ जण जखमी झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. हा अपघात कसा घडला याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात जहाज ब्रुकलिन ब्रीजला धडकतानाचा क्षण कैद झाला आहे.
माहितीनुसार, हे जहाज पूर्व नदीवरून जात होते त्यावेळी ही दुर्घटना घडली. यावेळी जहाजाचा वरील भाग ब्रीजला धडकला. या अपघातात अनेकजण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच न्यूयॉर्क फायर डिपार्टमेंटचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. व्हायरल व्हिडिओत जहाजाच्या वरील बाजूस मॅक्सिकोचा हिरवा, सफेद, लाल रंगाचा झेंडा फडकताना दिसतो. जो ब्रुकलिन ब्रीजच्या खालून जात असताना धडकताना दिसतो. त्यानंतर हे जहाज नदीच्या किनारी येताना दिसते.
मॅक्सिकन नौदलानेही सोशल मीडियावर पोस्ट करत हे प्रशिक्षण जहाज कुआउटेमोक ब्रुकलिन ब्रीजला धडकल्यामुळे अपघातग्रस्त झाले. त्यामुळे त्याचा प्रवास थांबवण्यात आल्याची माहिती दिली आहे. नौदल आणि स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू आहे. कुआउटेमोक हे प्रशिक्षण जहाज आहे. जे मॅक्सिकन नौदल स्कूलमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर समुद्री प्रवास करायला नेते. यावर्षी हे जहाज ६ एप्रिल रोजी मॅक्सिकोच्या प्रशांत तटावरील अकापुल्को बंदरावरून २७७ जणांना घेऊन रवाना झाले होते.
कसा होता जहाजाचा कार्यक्रम?
मॅक्सिकन नौदलाचे हे जहाज १५ देशातील २२ बंदरावर थांबणार होते. ज्यात किंग्सटन(जमैका), हवाना(क्यूबा), कोजुमेल(मॅक्सिको) आणि न्यूयॉर्कचा समावेश होता. त्याशिवाय ते रेक्याविक(आईसलँड) बोर्डो, सेंट मालो आणि डनकर्क(फ्रान्स), एबरडीन(स्कॉटलँड)सारख्या स्थानकांवर जाणार होते. एकूण २५४ दिवसांच्या या प्रवासात ते १७० दिवस समुद्रात आणि ८४ दिवस बंदरावर घालवणार होते. या जहाजाच्या अपघाताची मॅक्सिकन अधिकारी चौकशी करणार आहेत.