मेलोनी आणि चापो यांची 'हाइट ऑफ डिप्लोमसी! एका व्हायरल भेटीची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:24 IST2025-12-19T09:24:04+5:302025-12-19T09:24:56+5:30
सुमारे पाच फूट उंचीच्या जॉर्जिया मेलोनी आणि सुमारे सहा फूट आठ इंच उंचीचे चापो यांच्या भेटीत जॉर्जिया मेलोनी या विस्फारलेल्या डोळ्यांनी चापो यांच्याकडे पाहतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले.

मेलोनी आणि चापो यांची 'हाइट ऑफ डिप्लोमसी! एका व्हायरल भेटीची गोष्ट
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि मोझाम्बिकचे राष्ट्रपती डॅनियल फ्रान्सिस्को चापो यांच्या एका भेटीची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. इटलीतील पंतप्रधान कार्यालय ज्या पालाझो किजी इथे आहे तिथे ही भेट झाली. सुमारे पाच फूट उंचीच्या जॉर्जिया मेलोनी आणि सुमारे सहा फूट आठ इंच उंचीचे चापो यांच्या भेटीत जॉर्जिया मेलोनी या विस्फारलेल्या डोळ्यांनी चापो यांच्याकडे पाहतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. दोघांच्या उंचीतील फरकामुळे या फोटोवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. मेलोनी आणि चापो यांच्या उंचीमध्ये असलेल्या फरकामुळे त्या दोघांनाही एका फोटोफ्रेममध्ये बसवताना छायाचित्रकारांचीही तारांबळ उडाली. या भेटीला सोशल मीडियामध्ये 'हाइट ऑफ डिप्लोमसी' असेही संबोधण्यात येत आहे.
जॉर्जिया मेलोनी यांनी चापो यांच्या स्वागतासाठी पुढे होताच त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यापूर्वी आधी विस्फारलेल्या डोळ्यांनी मान वर करून त्यांच्याकडे पाहिले. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि मेलोनी यांच्या या दोन्ही मुद्रा कॅमेरामध्ये कैद झाल्या. त्यामुळे मेलोनी आणि चापो यांच्या भेटीचे हे फोटो व्हायरल झाले, यात काही नवल नाही.
डॅनियल फ्रान्सिस चापो यांनी २०२५ च्या सुरुवातीला मोझाम्बिकच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या उंचीमुळे ते कुठेही जातात आणि कुणालाही भेटतात, तेव्हा त्या भेटीची चर्चा होतेच. इटलीच्या अधिकृत दौऱ्यावर आल्यानंतर ते मेलोनी यांना भेटले, तेव्हाही त्याचीच पुनरावृत्ती झाली. या भेटीत इटली आणि मोझाम्बिक या दोन देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणे, ऊर्जा, व्यापार, आर्थिक आणि राजनैतिक संबंध अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
जॉर्जिया मेलोनी या इटली आणि युरोपमधील एक अत्यंत प्रसिद्ध राजकीय नेत्या म्हणून ओळखल्या जातात. ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांनी इटलीच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. त्यांच्या ठाम राजकीय भूमिकांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या सातत्याने चर्चेत असतात. स्थलांतरितांबाबतचे धोरण, राष्ट्रीय हितसंबंध आणि युरोपियन राजकारणात त्या वेळोवेळी घेत असलेल्या
भूमिका यामुळेही त्यांचे नाव अनेकदा आंतरराष्ट्रीय वृत्तमाध्यमांमध्ये झळकत असते.
भारतातही मेलोनी यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्या सोशल मीडियावर सक्रीय असतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त मेलोनी यांनी त्यांना शुभेच्छा देणारा फोटो पोस्ट केला होता. त्यात पंतप्रधान मोदी यांना 'सोर्स ऑफ इन्स्पिरेशन' म्हणून संबोधले होते. मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांच्या मैत्रीची चर्चा 'मीम्स'मधूनही सतत होत असते. त्यातूनच 'मेलोडी' हा हॅशटॅगही लोकप्रिय झालेला दिसतो.
मेलोनी यांचे व्यक्तीमत्व प्रसन्न आहे. त्यांच्या मनात काय चालले आहे हे अगदी सहज त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. त्यामुळेच मोझाम्बिकचे राष्ट्रपती चापो यांच्या स्वागत प्रसंगी त्यांच्या उंचीमुळे मेलोनी यांच्या चेहऱ्यावर उमटलेले विस्मयाचे भावही त्यांना लपवता आले नाहीत आणि त्या भेटीचे फोटो, व्हिडीओ सहज व्हायरल झाले.