‘नातं संपतं, आयुष्य नाही’! ‘घटस्फोटानंतर पुन्हा नव्यानं आयुष्य घडवण्यासाठी धैर्य लागतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 05:51 IST2025-04-25T05:49:10+5:302025-04-25T05:51:16+5:30
मेलिंडा यांच्या या पुस्तकात २७ वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपवण्याचा क्षण, आई-आजी होण्याचा अनुभव, गेट्स फाउंडेशनमध्ये काम करणं, ते सोडणं, महिला हक्क, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात नव्यानं काम उभं करणं अशा अनेक अनुभवांबद्दल त्यांनी लिहिलं आहे

‘नातं संपतं, आयुष्य नाही’! ‘घटस्फोटानंतर पुन्हा नव्यानं आयुष्य घडवण्यासाठी धैर्य लागतं
वलयांकित जोडप्यांचे घटस्फोट होतात तेव्हा चर्चा होते ती आर्थिक व्यवहारांची. घटस्फोटानंतर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या अब्जावधी रकमांबद्दलची; पण घटस्फोट म्हणजे फक्त एवढंच नसतं. बातम्यांच्या आड प्रत्यक्ष त्या दोघांच्या आयुष्यात आणि प्रत्येकाच्या स्वतंत्र आयुष्यात खूप काही घडत असतं. या अनुभवातून जाणाऱ्या व्यक्ती त्यावर बोलतात तेव्हाच ते जगासमोर येतं. ‘द नेक्स्ट डे’ हे मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी लिहिलेलं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं. या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त झालेल्या मुलाखतींमध्ये मेलिंडा गेट्स पहिल्यांदा घटस्फोटावर खुलेआम बोलल्या. आपल्या पुस्तकातही त्यांनी घटस्फोटाच्या प्रक्रियेत भावनिक, मानसिक पातळीवर त्यांनी जे-जे अनुभवलं त्यावर कुठलाही आडपडदा न ठेवता, संकोच न बाळगता मोकळेपणानं लिहिलं आहे.
मेलिंडा म्हणतात, ‘घटस्फोट हा दोन व्यक्तींचा होत असला, तरी ती गोष्ट पूर्ण कुटुंबासाठी फार अवघड असते. असा अनुभव खरंतर कोणाच्याच वाट्याला येऊ नये; पण प्रत्यक्षात आज अनेक कुटुंबांना घटस्फोटाच्या कटु अनुभवातून जावंच लागतं.’ असा अनुभव घेणाऱ्यांना आपल्या पुस्तकातून काहीतरी मार्ग मिळावा म्हणून मेलिंडा यांनी या पुस्तकात घटस्फोटाविषयीच्या अनुभवाबद्दल स्वत:च्या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे लिहिलं आहे. त्या सांगतात, ‘माझ्यासाठी घटस्फोट हा अतिशय वेदनादायी होता. तो अचानक झाला नाही. नात्याला हवा असलेला विश्वास कमी पडू लागला. त्याचा परिणाम म्हणून पारदर्शीपणा हरवू लागला. हे दोघांनाही जाणवू लागलं. त्यावर आम्ही खूप बोललो, विचार केला. आणि मग घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचलो. घटस्फोट म्हणजे आयुष्यातलं एक मोठं संक्रमण होतं; पण बिल आणि माझ्यातलं हे नातं जेव्हा संपलं तेव्हा त्या अनुभवातून मिळालेल्या एका धड्याने मी माझं आयुष्य पुन्हा फुलवू शकले. तो धडा म्हणजे ‘नातं संपलं, आयुष्य नाही!’ आपल्या आयुष्यातलं नाट्य, रोमांच, आनंद अजून शिल्लक आहे. आणि म्हणूनच घटस्फोटानंतर चार वर्षांनंतर जर कोणी गुगलून मी कशी आहे, काय करते आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर मी आनंदात आहे, हेच त्यांना दिसेल!’
मेलिंडा यांच्या या पुस्तकात २७ वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपवण्याचा क्षण, आई-आजी होण्याचा अनुभव, गेट्स फाउंडेशनमध्ये काम करणं, ते सोडणं, महिला हक्क, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात नव्यानं काम उभं करणं अशा अनेक अनुभवांबद्दल त्यांनी लिहिलं आहे. ‘घटस्फोटानंतर पुन्हा नव्यानं आयुष्य घडवण्यासाठी, जगण्यासाठी धैर्य लागतं; पण माझा माझ्या क्षमतांवर पूर्ण विश्वास होता. घटस्फोटानंतर माझी मी पुन्हा नव्याने, उमेदीने व्यवस्थित जगू शकते हे मला ठामपणे वाटत होतं आणि झालंही तसंच,’ असं मेलिंडा जेव्हा सांगतात. बिल गेट्स आणि मेलिंडा या दोघांसाठीही घटस्फोटाचा अनुभव कटुच होता; पण घटस्फोटानंतरचं आयुष्य त्यांनी कटू आणि रुक्ष केलं नाही. दोघेही आपल्या आयुष्यात स्वतंत्रपणे नव्याने रमले आहेत. तिन्ही मुलांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणांना मेलिंडा यांच्यासोबत बिलही मुलांसोबत, नातवंडांसोबत हजर असतात. कौटुंबिक क्षणांचा एकत्र आनंद घेतात. पती-पत्नीचं नातं जरी संपलं असलं, तरी त्यांच्यात असलेल्या मैत्रीच्या नात्याचा अनुभव खुल्या दिलानंं घेतात.