तुर्कीमधील कार्तलकाया रिसॉर्टला भीषण आग; पर्यटकांनी उड्या मारल्या, ६६ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:57 IST2025-01-21T18:57:38+5:302025-01-21T18:57:59+5:30
आग लागल्याचे समजताच हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांनी खिडक्या, गॅलरीतून चादरींची दोरी करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

तुर्कीमधील कार्तलकाया रिसॉर्टला भीषण आग; पर्यटकांनी उड्या मारल्या, ६६ जणांचा मृत्यू
तुर्कीच्या बर्फाच्छादीत प्रदेशातील एका मोठ्या रिसॉर्टला लागलेल्या भीषण आगीत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. खोलीतील हवामान गरम करण्यासाठी असलेल्या प्रणालीमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.
वायव्य तुर्कीमधील कार्तलकाया रिसॉर्टला ही आग लागली. आग लागल्याचे समजताच हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांनी खिडक्या, गॅलरीतून चादरींची दोरी करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी आगीमुळे खाली उड्या मारल्या. यामुळे त्यांचा खाली पडून मृत्यू झाला.
राजधानी अंकाराच्या वायव्येस सुमारे १७० किलोमीटरवर हे रिसॉर्ट आहे. या आगीत ६६ नागरिकांनी आपले प्राण गमावले आणि ५१ जण जखमी झाल्याचे तुर्कीच्या मंत्र्यांनी सांगितले.
कार्तलकाया हे १२ मजल्यांचे लाकडापासून बनविलेले हॉटेल होते. पहाटे ३:२७ वाजता ही आग लागली. सुमारे २३८ पर्यटक या ठिकाणी राहण्यासाठी आले होते. शाळांना सलग दोन आठवडे सुट्टी होती, यामुळे पर्यटक वाढले होते.