इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 09:38 IST2025-04-27T09:38:44+5:302025-04-27T09:38:58+5:30
दक्षिण इराणमधील बंदर अब्बास येथील शाहिद राजाई बंदरात हा स्फोट झाला आहे. क्षेपणास्त्र विरोधी स्फोटके बनविण्यासाठी रासायनिक घटक आणले जात होते.

इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी
इराणच्या बंदरावर मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये जवळपास १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी झाले आहेत. इराणच्या आकाशात मोठमोठे मशरुमसारखे धुराचे ढग निर्माण झाले आहेत. यावरून स्फोटाची तीव्रता लक्षात येत आहे.
दक्षिण इराणमधील बंदर अब्बास येथील शाहिद राजाई बंदरात हा स्फोट झाला आहे. क्षेपणास्त्र विरोधी स्फोटके बनविण्यासाठी रासायनिक घटक आणले जात होते. यामध्ये हा स्फोट झाला आहे. इराणला अमेरिकेने धमकी दिलेली आहे. यामुळे इराण ताकद वाढवत आहे. यामुळे हा घातपात केला गेला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
तेहरान वेगाने अण्वस्त्रांची ताकद वाढवू पाहत आहे, त्यांना थांबविण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. अमेरिका आणि इराणध्ये अणुकार्यक्रमावर शनिवारी ओमानमध्ये चर्चेची तिसरी फेरी झाली. या भेटीनंतर लगेचच हा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे आजुबाजुच्या कंटेनरनाही आग लागली होती. त्यातही स्फोट झाल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये स्फोटानंतर काळा धूर निघत असल्याचे दिसून आले.
क्षेपणास्त्रासाठीचे इंधन बनविण्याची ही रसायने होती. चीनमधून ती इराणला पाठविण्यात आली होती. मार्चमध्येच ती पोहोचली होती. यापैकी काही भाग हा बंदरावर होता. तो हलविला जात होता. यावेळी हा स्फोट झाला आहे. गाझा पट्टीत हमासशी झालेल्या युद्धादरम्यान इस्रायलवर थेट हल्ल्यांमुळे संपलेल्या इराणमधील क्षेपणास्त्रांचा साठा पुन्हा निर्माण केला जात आहे, त्यात भरण्यासाठी हे इंधन वापरण्यात येणार होते. २०२० मध्येही असाच स्फोट बैरूत बंदरात झाला होता. यावेळी २०० हून अधिक बळी गेले होते, तसेच ६,००० हून अधिक जखमी झाले होते.