मसूदची आता महिला दहशतवादी ब्रिगेड! भरती, ट्रेनिंग आणि ‘ग्लोबल जिहाद’साठी वापराचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:15 IST2025-11-06T11:14:40+5:302025-11-06T11:15:15+5:30

मसूदला आताच ‘महिला दहशतवादी’ तयार करण्याचं सुचलं, याचं कारण ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये असलेला महिलांचा सहभाग !

Masood's now a women's terrorist brigade! Recruitment, training and use plan for 'global jihad' | मसूदची आता महिला दहशतवादी ब्रिगेड! भरती, ट्रेनिंग आणि ‘ग्लोबल जिहाद’साठी वापराचा प्लॅन

मसूदची आता महिला दहशतवादी ब्रिगेड! भरती, ट्रेनिंग आणि ‘ग्लोबल जिहाद’साठी वापराचा प्लॅन

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने पाकिस्तानात घुसून पाकिस्तानी अतिरेक्यांचे कंबरडे मोडल्यामुळे आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेचे तीन तेरा वाजवल्यामुळे या संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे.

या ऑपरेशनचं आणखी एक महत्त्व म्हणजे या मोहिमेत भारतीय लष्कराच्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांचाही त्यात सहभाग होता. या मोहिमेची सारी माहिती पत्रकार परिषदेद्वारे त्यांनीच दिली होती. यामुळेही मसूद अजहरच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. या साऱ्या प्रकरणातून ‘धडा’ घेतल्यामुळे मसूद अजहरनं आता पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी आणि त्यांचं केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जैश-ए-मोहम्मदतर्फे महिलांना दहशतवादचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. पाकिस्तानातील अधिकाधिक महिलांनी दहशतवादाकडे वळावं यासाठी त्यानं महिलांना प्रलोभनही दाखवलं आहे. त्याचं म्हणणं आहे, ज्या पाकिस्तानी महिला दहशतवादी केंद्राच्या सदस्य बनतील आणि शस्त्रं हातात घेतील त्यांना ‘जन्नत’ मिळेल. 

मसूद अजहरच्या योजनेनुसार पाकिस्तानात आता प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादाचं एक केंद्र असेल आणि या केंद्राची एक प्रमुख असेल. स्थानिक महिलांना या दहशतवादी केंद्रात महिलांना भरती करण्याचे अधिकार या महिला प्रमुखाकडे असेल. त्यासाठीचे नियमही अतिशय कडक असतील. या ‘ब्रिगेड’मध्ये सामील महिलांनी फोन किंवा मेसेंजरवर कोणत्याही अनोळखी पुरुषाशी बोलायचं नाही, असा नियम आहे. पुरुष आणि महिला लढवय्ये एकत्र काम करतील आणि संपूर्ण जगात इस्लाम पसरवतील, अशी मसूदची योजना आहे. 

मसूद अजहरनं त्यासाठी २१ मिनिटांचा ऑडिओ जारी केला आहे. त्यात महिलांची भरती, ट्रेनिंग आणि ‘ग्लोबल जिहाद’साठी त्यांचा वापर करण्याचा संपूर्ण प्लॅन स्पष्ट केला आहे. या युनिटचं नेतृत्व मसूदची बहीण सादिया अजहर करत आहे. सादियाचा नवरा युसूफ अजहर ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरदरम्यान ठार झाला होता. भारतानं ऑपरेशन सिंदूरदरम्यान बहावलपूरमधल्या एका दहशतवादी केंद्राला लक्ष्य केलं होतं, जिथे अनेक दहशतवादी लपलेले होते.

अजहरच्या म्हणण्याप्रमाणे पुरुषांसाठी जसा ‘दौरा-ए-तरबियत’ कोर्स असतो, तसंच महिलांसाठी पहिला कोर्स ‘दौरा-ए-तस्किया’ असेल. बहावलपूरच्या केंद्रात महिलांना दहशतवादाचं आणि इतर प्रशिक्षण दिलं जाईल. दुसरा टप्पा ‘दौरा-आयत-उल-निसाह’ असेल, ज्यात महिलांना जिहाद करण्याची पद्धत शिकवली जाईल. हा कोर्स गेल्या २० वर्षांपासून पुरुषांना जिहादसाठी तयार करतो, ज्यात भारताविरुद्ध लढून मृत्यू आल्यास जन्नत मिळण्याचं आश्वासन दिलं जातं. आता महिलांनाही हेच शिकवलं जाणार आहे.

‘आयसिस’ आणि ‘बोको हराम’सारख्या संघटना महिलांचा वापर आत्मघाती हल्ल्यांसाठी करतात, पण जैश ए मोहम्मद, लष्कर आणि हिजबुलसारख्या संघटनांनी याआधी असं केलं नव्हतं. पण मसूदला आताच ‘महिला दहशतवादी’ तयार करण्याचं सुचलं, याचं कारण ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये असलेला महिलांचा सहभाग!

Web Title: Masood's now a women's terrorist brigade! Recruitment, training and use plan for 'global jihad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.