नवी दिल्ली : आयसी-८१४ विमान अपहरण प्रकरणाचा सूत्रधार व जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर अब्दुल रौफ अझहर हा भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरद्वारे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांत ठार झाला. पाकिस्तानच्या बहावलपूर येथे जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर केलेल्या माऱ्यात कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्य ठार झाले, तर त्याचा धाकटा भाऊ अब्दुलही गंभीर जखमी झाला होता. त्याचाही मृत्यू झाल्याचे गुरुवारी सूत्रांनी सांगितले.
अब्दुल रौफ अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा सर्वोच्च कमांडर होता. त्याने २१ एप्रिल २००७ रोजी संघटनेच्या नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली. तो पाकिस्तानातील देवबंदी जिहादी मौलवी आणि दहशतवादी होता. भारतात विविध दहशतवादी हल्ल्यांचे कट रचल्यामुळे तो अनेक गुन्ह्यांसाठी भारतीय तपास यंत्रणांना हवा होता.
अब्दुल रौफ अझहरने १९९९मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या आयसी-८१४ विमानाचे अपहरण करण्याचा कट रचला होता. त्याद्वारे आपला मोठा भाऊ मसूद अझहरला सोडविण्यात त्याला यश आले होते. त्यानंतर भारतात जैश-ए-मोहम्मदने केलेल्या सर्व मोठ्या हल्ल्यांमागे अब्दुल रौफ अझहरचा हात आहे.२००१ साली जम्मू-काश्मीर विधानसभेवर व भारतीय 3 संसदेवर झालेले आत्मघाती हल्ले, २०१६चा पठाणकोट हवाई तळावरील हल्ला, नगरोटा, कठुआतील लष्करी छावणींवरील मारा, २०१९चा पुलवामा आत्मघाती हल्ला यांच्या मागे अब्दुलचा हात होता.