मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 18:01 IST2025-12-12T18:01:05+5:302025-12-12T18:01:43+5:30
Mars Effect On Earth Climate: पृथ्वीवरील वातावारणातील बदल हे केवळ सूर्य किंवा प्रदूषणामुळे नाही, तर त्यामागे आणखीही काही कारणं आहेत, अशी धक्कादायक माहिती संशोधनामधून समोर आली आहे. तसेच ही माहिती तुम्हाला विचार करण्यास भाग पाडणारी आहे.

मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर
पृथ्वीवरील वातावारणातील बदल हे केवळ सूर्य किंवा प्रदूषणामुळे नाही, तर त्यामागे आणखीही काही कारणं आहेत, अशी धक्कादायक माहिती संशोधनामधून समोर आली आहे. तसेच ही माहिती तुम्हाला विचार करण्यास भाग पाडणारी आहे. पृथ्वीचा शेजारी आणि सर्वसामान्यांपासून संशोधकांपर्यंत सर्वांसाठी सध्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या मंगळ ग्रहाचा पृथ्वीच्या वातावरणावर व्यापक प्रभाव पडतो. हा लाल ग्रह आपल्या गुरुत्वाकर्षणाद्वारे पृथ्वीला आपल्याकडे ओढतो आणि हवामानात बदल घडवतो, अशी माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या नव्या संशोधनानुसार मंगळ ग्रह पृथ्वीची कक्षा आणि कलाला नियंत्रित करतो. याला मिलानकोविक सायकल म्हणतात. जर मंगळ ग्रह नसता तर पृथ्वीवरील वातावरण आज आहे, तसं नसतं. स्टीफन केन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधानमधून ही विज्ञान जगतात खळबळ माजवणारी ही माहिती समोर आली आहे. या संशोधनामुळे इतर ग्रह हे आपल्या जगावर कसा प्रभाव टाकत आहेत, हे समोर आले आहे. तसेच आपलं हवामान हे केवळ एका ग्रहामुळे तयार झालेलं नाही, हेही लक्षात घेणं आवश्यक आहे.
कधी बर्फाच्छादित तर कधी गरम असं पृथ्वीचं वातावरण लाखो वर्षांपासून राहिलेलं आहे. शास्त्रज्ञ याला मिलानकोविच सायकल म्हणतात. हे सर्व पृथ्वीची कक्षा आणि तिच्या झुकण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. आतापर्यंत गुरू आणि शुक्र यासारखे मोठे ग्रह यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मानले जात असे. मात्र आता नव्या संशोधनाने हे गृहितक बदललं आहे.
स्टीफन केन आणि त्यांच्या टीमने एक वेगळा प्रयोग केला. त्यांनी कॉम्प्युटर सिम्युलेशनचा वापर केला. यामध्ये त्यांनी मंगळ ग्रहाच्या वजनाला शुन्यापासून १० पटीपर्यंत वाढवले. त्यानंतर मंगळ ग्रहाच्या वजनातील बदलामुळे पृथ्वीच्या कक्षेवर काय परिणाम होतो, हे पाहिले. त्यामधून मिळालेलं उत्तर आश्चर्चाचा धक्का देणारं होतं. मंगळ ग्रह हा आकाराने छोटा असूनही त्याचा प्रभाव मात्र खूप व्यापक होता.
सौरमालेमध्ये एक लय काम करते असे संशोधकांना दिसून आले. शुक्र आणि गुरू हे मिळून ४ लाख पाच वर्षांचं एक चक्र चालवतात. हे एक मेट्रोनोमसारखं असून, ते टिक टिक करत राहतं. मंगळ ग्रहाचं वजन काहीही असलं तर हे चक्र बदलत नाही. हा पृथ्वीच्या वातावरणाचा पाया आहे. पण ही कहाणी येथेच संपत नाही. याच एक १ लाख वर्षांच छोटं चक्रही आहे. हेच चक्र पृथ्वीवर हिमयुग कधी येणार हे निश्चित करतं. हे चक्र मंगळ ग्रहावर अवलंबून असल्याचं संशोधनामधून दिसून आलं आहे. जर मंगळ ग्रहाचं वजन वाढलं तर हे चक्र लांबवतं. याचा अर्थ मंगळ ग्रह हाच पृथ्वीवरील हिमयुगाची वेळ निश्चित करणारा कारक असल्याचे निष्पन्न होते.
आता या संशोधनामुळे पृथ्वीवरील वातावरण व्यवस्था ही आयसोलेशनमध्ये काम करत नाही, हे स्पष्ट झाले आहे. आपण एकटे नाही आहोत तर आपलं वातावरण हे आजूबाजूच्या ग्रहांच्या चालीवर अवलंबून आहे. गुरू आणि शुक्र हे त्यातील प्रमुख आहेत. मात्र मंगळाची भूमिकाही त्यात महत्त्वाची आहे, तसेच मंगळ ग्रह हा अतिशय शांतपणे पृथ्वीवरील हवामान, पृथ्वीवरील हिमयुग आणि मानवी अस्तित्वाला प्रभावित करतो.