चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 19:49 IST2025-11-03T19:47:57+5:302025-11-03T19:49:25+5:30
चीनची बजेट एअरलाइन, स्प्रिंग एअरलाइन्सने एअर होस्टेस उमेदवारांसाठी, विशेषतः २५ ते ४० वयोगटातील विवाहित महिला आणि मातांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. या निर्णयाचे कौतुक होत असले तरी, कंपनीने वापरलेल्या (एअर आंटी) या पदवीमुळे वाद निर्माण झाला आहे.

चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
एका चीनी एअर लाईन कंपनीने एअर होस्टेस पदांसाठी भरती सुरू केली आहे. कंपनीने विवाहित महिला आणि मातांना 'एअर आंटी' म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली. या कर्मचाऱ्यांना "एअर आंटी" असे वर्णन केले आहे. यामुळे आता नवीन वाद सुरू झाला आहे. अनेकांनी हा शब्द अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. यामुळे हा शब्द मागे घेण्याची मागणी केली आहे. सर्व एअर होस्टेससाठी समान पदवी वापरली पाहिजे, मग ती विवाहित असो वा नसो. "एअर आंटी" हा शब्द मुले असलेल्या विवाहित एअर होस्टेससाठी अपमानजनक असल्याचे अनेकांचे मत आहे.
२२ ऑक्टोबर रोजी, चीनची पहिली बजेट एअरलाइन असलेल्या शांघाय-स्थित स्प्रिंग एअरलाइन्सने एअर आंटी पदासाठी अर्ज मागवले. कंपनी २५ ते ४० वयोगटातील अशा महिलांच्या शोधात आहे, ज्या विवाहित आहेत किंवा ज्यांना मुले आहेत अशा महिलांना संधी देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अर्ज करणाऱ्या महिलांकडे किमान बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. त्यांची उंची १६२ ते १७४ सेंटीमीटर दरम्यान असणे आवश्यक आहे आणि त्यांना ग्राहक सेवेचा अनुभव असणे आवश्यक आहे.
'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट' नुसार, ही पदे शांघाय आणि वायव्य शहर लांझोऊसाठी आहेत. कंपनी ३० ते ६० महिलांना संधी देणार आहे. चिनी एअरलाइन्स १८ ते २५ वयोगटातील फ्लाइट अटेंडंटना कामावर ठेवतात.
कंपनी आणि अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण
"एअर आंटी" त्यांच्या जीवनातील अनुभव आणि सहानुभूतीमुळे मुलांची आणि वृद्ध प्रवाशांची अधिक चांगली काळजी घेऊ शकतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हे पाऊल महिलांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या आणि त्यांच्या कार्यबलाचा विस्तार करण्याच्या त्यांच्या उपक्रमाचा एक भाग आहे. चीनमध्ये महिलांसाठी कायदेशीर निवृत्तीचे वय साधारणपणे ५० वर्षे आहे.
स्प्रिंग एअरलाइन्सची नोकरीची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याला ७ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले. लोक "एअर आंटी" या शब्दाबद्दल नापसंती व्यक्त करत आहेत. अनेकांनी या शब्दाला विरोध केला.
दरम्यान, याबाबत एअर लाईन कंपनीने स्पष्टीकरण दिले. 'कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. आम्हाला फक्त विवाहित आणि अविवाहित उमेदवारांमध्ये फरक करायचा होता. त्यांचे काम, पगार आणि करिअरचा मार्ग इतर कोणत्याही फ्लाइट अटेंडंटसारखाच राहील.", असे कंपनीने म्हटले आहे.
'एअर आंटी' हा शब्द १९९० च्या दशकात सुरू झाला. चीनच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्राने कामावरून काढून टाकलेल्या महिला कापड कामगारांना फ्लाइट अटेंडंट म्हणून भरती करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून हे नाव वापरात आहे, असेही कंपनीने सांगितले.