फेसबुकच्या नकारात्मक परिणामांबद्दल मार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्त केली दिलगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 23:32 IST2017-10-02T23:23:59+5:302017-10-02T23:32:59+5:30
सोशल मिडीयाच्या नकारात्मक परिणामांबद्दल फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. फेसबुकचा वापर समाजाला एकत्र आणण्याऐवजी त्यामध्ये फूट पाडण्याचे काम होत असल्याने आपल्याला क्षमा करण्यात यावी, असे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.

फेसबुकच्या नकारात्मक परिणामांबद्दल मार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्त केली दिलगिरी
वॉशिंग्टन- सोशल मिडीयाच्या नकारात्मक परिणामांबद्दल फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. फेसबुकचा वापर समाजाला एकत्र आणण्याऐवजी त्यामध्ये फूट पाडण्याचे काम होत असल्याने आपल्याला क्षमा करण्यात यावी, असे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मार्क झुकेरबर्ग यांनी दिलगिरी व्यक्त कोणत्याही घटनेचा उल्लेख केला नाही. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या फायद्यासाठीच फेसबुकचा वापर करण्यात आला. यासाठी रशियातील नागरिकांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी फेसबुकचा उपयोग केल्याचे बोलले जात आहे. तसेच, रशियन नागरिकांनी फेसबुकचा वापर गेल्या दशकभरापासून असत्य पसरवण्यासाठी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच संदर्भात झुकेरबर्गने आपल्या फेसबुक पेजवरून ही दिलगिरी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. या वर्षात माझ्याकडून ज्यांना कुणाला दु:ख झाले. त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. तसेच, यापुढे चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन, असे त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर लिहिले आहे.
रशियाच्या 470 बनावट कंपन्यांनी जून 2015 ते मे 2017 दरम्यान फेसबुकवर केलेल्या जाहिराती अमेरिकेच्या संसदेला सादर केल्या जातील, असे फेसबुकने अलिकडेच म्हटले होते. या जाहिरातींमधून राष्ट्राध्यक्ष निवडणूकीसाठी थेट प्रचार करण्यात आला नव्हता. मात्र गे हक्क, वंश, शरणार्थी आणि शस्त्र बाळगण्याच्या हक्कासारख्या महत्वाच्या विषयांचाच प्रचार केला गेला होता.