राज्यसभा खासदारांसह अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकले, सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 18:18 IST2023-10-08T18:17:06+5:302023-10-08T18:18:01+5:30
Israel-Hamas war: पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने शनिवारी केलेल्या तुफानी हल्ल्यांमुळे इस्राइलमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या हल्ल्यांनंतर अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकून पडले आहेत.

राज्यसभा खासदारांसह अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकले, सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न सुरू
पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने शनिवारी केलेल्या तुफानी हल्ल्यांमुळे इस्राइलमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या हल्ल्यांनंतर अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकून पडले आहेत. त्यामध्ये भारतातील राज्यसभा खासदार डॉ. वानवेइरॉय खारलुखी त्यांची पत्नी मुलगी आणि इतरांचा समावेश आहे. या सर्वांना इस्राइलमधून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी परराष्ट्रमंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत.
मेघालयमधी सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. खारलुखी आणि पूर्वोत्तर राज्यांमधील आणखी २४ मूळनिवासी धार्मिक यात्रेसाठी जेरुसलेम येथे गेले होते. इस्राइलवर झालेल्या हल्ल्यानंतर ते तिथे अडकले आहेत. वाढत्या हिंसाचारामुळे बेथलहेममधील परिस्थिती तणावपूर्ण आहे.
मेघालयचे मुख्यमंत्री आणि एनपीपीचे प्रमुख कॉनराड संगमा यांनी सांगितले की, डॉ. खारलुखी यांना सुरक्षित भारतात आणण्यासाठी आम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहोत. दरम्यान, इस्राइल आणि पॅलेस्टाइनमधील भारतीय दूतावासांनी भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यकता भासल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. इस्राइल आणि हमास यांच्यातील संघर्षात आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार इस्राइलमध्ये सुमारे १८ हजार भारतीय नागरिक आहेत. त्यांच्यामध्ये मुख्यत्वेकरून इस्राइली वयोवृद्ध, हिरे व्यापारी, आयटी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या देखभालीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या लोकांचा समावेश आहे. त्याशिवाय इस्राइलमध्ये भारतीय वंशाचे सुमारे ८५ हजार यहुदीसुद्धा आहेत. हे लोक ५० आणि ६० च्या दशकात भारतामधून इस्राइलमध्ये गेले होते.