पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 06:45 IST2025-09-22T06:42:55+5:302025-09-22T06:45:10+5:30
पाकिस्तानी नागरिकही आपल्या देशाला आणि तिथल्या त्रासाला कंटाळले आहेत. पाकिस्तानातून कसं बाहेर पडायचं याचे मार्ग ते सातत्यानं शोधतच असतात.

पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
‘अतिरेक्यांचं उगमस्थान’ म्हणून पाकिस्तान अख्ख्या जगात बदनाम आहे. पाकिस्ताननं अनेक अतिरेक्यांना ‘जन्म’ तर दिलाच; पण हेच अतिरेकी नंतर भारतासह विविध देशांत जाऊन त्यांनी विध्वंस घडवला. पाकिस्तान सर्वच बाजूंनी पोखरला गेला आहे. देशात अशांतता आहे, अस्थिरता आहे. लोक भुकेकंगाल आहेत. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.
पाकिस्तानी नागरिकही आपल्या देशाला आणि तिथल्या त्रासाला कंटाळले आहेत. पाकिस्तानातून कसं बाहेर पडायचं याचे मार्ग ते सातत्यानं शोधतच असतात. त्यासाठी काही वर्षांपूर्वी त्यांनी नवा फंडा शोधला होता. काही करून अरब देशांमध्ये जायचं आणि तिथे गेलं की तिथलंच व्हायचं. तिथून परत यायचं नाही आणि तिथे जाऊन काय कामधंदा करायचा? - तर भीक मागायची! त्यामुळे या अरब देशांनी पाकिस्तानी भिकाऱ्यांना आपल्या देशात येण्यावर बंदी घातली होती.
आता काही पाकिस्तानी दलालांनी आपल्या देशातील नागरिकांना परदेशात पाठवण्यासाठी आणखी एक वेगळाच आणि अफलातून फंडा वापरायला सुरुवात केली आहे.
काय आहे हा फंडा? पाकिस्तानातून अनेक ‘फुटबॉलपटू’ आता परदेशात जात आहेत आणि त्यांच्या नेहमीच्या ‘शिरस्त्याप्रमाणे’ तिथलेच होत आहेत! पाकिस्तानी फुटबॉलपटूंची एक टीम नुकतीच जपानला गेली होती. या टीममध्ये २२ ‘खेळाडू’ होते, पण हे खेळाडू जपानला पोहोचल्यानंतर त्यांना एअरपार्टवरच पकडण्यात आलं आणि त्यांना परत पाकिस्तानात पाठवण्यात आलं. कारण हे सगळे फुटबॉलपटू नकली होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे ते जपानला पोहोचले होते. पण तिथे पोहोचताच त्यांचा डाव उघडकीस आला आणि त्यांना आल्या पावली जपानमधून परत पाठवण्यात आलं.
चौकशी केल्यावर कळलं, लोकांना परदेशात पाठवणारं हे एक मोठं रॅकेटच आहे. प्रत्यक्षात असे अनेक रॅकेट्स पाकिस्तानात कार्यरत आहेत. सध्याच्या या रॅकेटचा म्होरक्या होता मलिक वकास. ‘सरळ’ मार्गानं जर लोकांना परदेशात पाठवलं तर संशय येईल म्हणून त्यानं या २२ लोकांना चक्क फुटबॉलपटू बनवलं. फुटबॉलपटू म्हणून त्यांना प्रशिक्षण दिलं. फुटबॉलपटूचे कपडेही त्यांच्या अंगावर चढवले.. पण तरीही हे बिंग फुटलंच..
टीममध्ये असलेल्या सगळ्या ‘खेळाडूं’कडून प्रत्येकी ४० लाख रुपये घेऊन त्यांना परदेशात पाठवलं गेलं होतं. त्यासाठी ‘गोल्डन फुटबॉल ट्रायल’ नावाचा बनावट फुटबॉल क्लब तयार करण्यात आला होता. एवढंच नाही, तर हा क्लब पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनशी संलग्न असल्याची कागदपत्रंही तयार करण्यात आली होती. हे कमी की काय म्हणून या टीमला जेव्हा जपानमध्ये अडवण्यात आलं, त्यांच्याकडून कागदपत्रांची मागणी करण्यात आली, त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेलं ‘एनओसी’ प्रमाणपत्रही त्यांनी जपानी अधिकाऱ्यांना दाखवलं!
या फुटबॉल टीमला आता अटक करण्यात आली आहे. मानव तस्करीचं हे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. याआधीही अशाच प्रकारे अनेक फुटबॉल खेळाडूंना जपानमध्ये पाठवण्यात आलं होतं. ती ट्रिक यशस्वी झाल्यानं पाकिस्तानातून अनेक ‘फुटबॉलपटू’ जपान आणि इतर देशांत जायला लागले होते. अर्थातच हे फुटबॉलपटू त्यानंतर पुन्हा कधीच पाकिस्तानात परतलेले नाहीत!