मेक्सिकोमध्ये समुद्रकिनाऱ्याजवळ 8.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का; सहा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:24 IST2017-09-08T10:48:41+5:302017-09-08T17:24:57+5:30
मेक्सिकोमध्ये समुद्रकिनाऱ्याजवळ मोठा भूकंपाचा धक्का बसला आहे.

मेक्सिकोमध्ये समुद्रकिनाऱ्याजवळ 8.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का; सहा जणांचा मृत्यू
मेक्सिको सिटी, दि. 8- मेक्सिकोला गुरूवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपामुळे ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने दिली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ८.१ एवढी नोंदविण्यात आली. भूकंपामुळे कमी तीव्रतेचे त्सुनामी वादळही आलं. ज्यामुळे आलेल्या लाटांनी काही इमारतींचं नुकसान झाल्याचं समजतं आहे. १९८५ मध्ये जो भूकंप मेक्सिकोत आला होता त्यावेळी हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. गुरूवारी झालेल्या भूकंपामुळे मेक्सिकोतील नागरिकांना १९८५ च्या त्या भूकंपाची आठवण करून दिली. 1985 नंतर बसलेला हा मोठा भूकंपाचा धक्का बसल्याचीही चर्चा आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील माहिती दिली आहे.
Earthquake of magnitude 8.0 hits off Mexican coast: USGS pic.twitter.com/JXjNUDhSNb
— ANI (@ANI) September 8, 2017
या भूकंपामुळे अमेरिकासह मेक्सिकोमध्ये त्सुनामीचा अंदाज वर्तविण्यात आाला असून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरूवारी मध्यरात्री झालेल्या भूकंपाचे धक्का ग्वटेमाला, एल सल्वाडोर, कोर्टारिका, निकारागुआ, पनामा, होन्डुरास आणि इक्वाडोरमध्ये जाणवले. मेक्सिकोतील पिजिजियापन शहरात भूकंपाची तीव्रता सर्वाधिक आहे. या ठिकाणी जमीन दुभंगल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पिजिजियापनपासून १२३ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मेक्सिकोत भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झालं आहे.
भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. हेलिकॉप्टरच्या आधारे किती नुकसान झालं याची पाहणी करण्यात आली. अनेक लोकांनी भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्याने घराबाहेरच थांबणं पसंत केलं.
आमच्यासाठी हा धक्कादायक अनुभव होता आणि संपूर्ण इमारतच खाली पडेल की काय? अशी भीती आम्हाला वाटली, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली. सुरूवातीला काय होतं आहे ते समजलं नाही त्यामुळे हसू आलं, पण नंतर लाइट गेली आणि आता काय होणार ते कळतच नव्हतं, मग मात्र मी घाबरून गेलो अशी प्रतिक्रिया लुइस कार्लोस या ३१ वर्षीय नागरिकाने दिली.
मेक्सिकोच्या नागरी संरक्षण एजन्सीच्या माहितीनुसार गुरूवारी मेक्सिकोमध्ये आलेला भूकंप हा 1985 नंतरचा मोठा भूकंप आहे. 1985 मध्ये मेक्सिकोमध्ये झालेल्या भूकंपात अनेक इमारती पडल्या होत्या तसंच शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. गुरूवारी मध्यरात्री जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे तेथिल लोक रस्त्यावर धावली. भूकंपामुळे काही ठिकाणांचा विद्युत पुरवठाही खंडीत झाल्याचं एका प्रत्यक्षदर्शीने राऊटर या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.