ब्रिटनच्या ईस्ट यॉर्कशायरच्या किनाऱ्यापासून सुमारे 10 मैल अंतरावर तेल टँकर आणि मालवाहू जहाजाची भीषण टक्कर झाल्याची घटना घडली आहे. यात अनेकजण जखमी झाले आहेत. ही टक्कर इतकी भीषण होती की, तेल टँकरसह मालवाहू जहाजाने पेट घेतला. अपघाताची माहिती मिळताच लाइफबोट आणि कोस्ट गार्ड हेलिकॉप्टर बचाव कार्यात तैनात करण्यात आले.
बीबीसीच्या वृत्तानुसार, उत्तर समुद्रात तेल टँकर आणि मालवाहू जहाज यांच्यात टक्कर झाली आहे. स्टेना इमॅक्युलेट या टँकरमधील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे शिपिंग कंपनीने सांगितले. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये टँकरमधून दाट धूर निघताना दिसत आहे. अँकरिंग करताना ही टक्कर झाल्याचे समजते.
येमेन आणि जिबूती दरम्यान मोठा अपघात अलीकडच्या काळात समुद्रात झालेला हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्ी येमेन आणि जिबूती दरम्यान स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या चार बोटी बुडाल्या. या अपघातात 180 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. अपघाताची पुष्टी करताना, संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने (IOM) याचे वर्णन जगातील सर्वात धोकादायक स्थलांतर मार्गांपैकी एक म्हणून केले आहे.
हा मार्ग मुख्यतः इथिओपियन स्थलांतरित काम शोधण्यासाठी किंवा आखाती देशांमध्ये संघर्षातून सुटण्यासाठी वापरतात, असे आयओएमने म्हटले आहे. हा मार्ग यापूर्वीही जीवघेणा ठरला आहे. 2024 मध्ये 60,000 हून अधिक स्थलांतरित या मार्गाने येमेनमध्ये पोहोचले, तर 558 लोकांचा मृत्यू झाला होता.