लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:35 IST2025-12-11T11:35:16+5:302025-12-11T11:35:41+5:30
Luthra Brothers Arrest Thailand: ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री अरपोरा येथील नाइटक्लबमध्ये भीषण आग लागली होती, ज्यात २० कर्मचारी आणि ५ पर्यटकांसह २५ जणांचा मृत्यू झाला.

लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
गोव्यातील 'बर्च बाय रोमियो लेन' नाइटक्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा बळी घेतल्यानंतर थायलंडमधील फुकेत येथे पळून गेलेले क्लबचे फाउंडर गौरव आणि सौरभ लूथरा यांना थायलंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेच्या अवघ्या १०० तासांच्या आत ही मोठी कारवाई करण्यात आली असून, यामुळे दोन्ही आरोपींना भारतात प्रत्यार्पित करण्याची प्रक्रिया आता अत्यंत सोपी झाली आहे.
६ डिसेंबर रोजी मध्यरात्री अरपोरा येथील नाइटक्लबमध्ये भीषण आग लागली होती, ज्यात २० कर्मचारी आणि ५ पर्यटकांसह २५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर काही तासांतच क्लबचे फाउंडर लूथरा बंधू ७ डिसेंबर रोजी पहाटे इंडिगोच्या विमानाने देश सोडून थायलंडमधील फुकेत येथे पळून गेले होते.
गोवा पोलिसांनी या प्रकरणात लूथरा बंधूंवर गुन्हा दाखल केल्यानंतर तातडीने कठोर कारवाई सुरू केली. गोवा सरकारच्या विनंतीवरून विदेश मंत्रालयाने लूथरा बंधूंचे पासपोर्ट त्वरित निलंबित केले. यामुळे ते फुकेत सोडून जगातील इतर कोणत्याही देशात पळून जाऊ शकणार नाहीत.
ब्लू कॉर्नर नोटीस
आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोपींचा शोध घेण्यासाठी इंटरपोलने मंगळवारी त्यांच्या विरोधात 'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी केली.
दिल्ली कोर्टात झटका
अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी लूथरा बंधूंनी दिल्लीच्या रोहिणी कोर्टात 'ट्रान्झिट अग्रिम जामीन' अर्ज दाखल केला होता, परंतु न्यायालयाने त्यांना तातडीने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंडमधील ताब्यात घेतल्यानंतर आता कायद्यानुसार त्यांना लवकरच भारतात आणले जाईल आणि या २५ निष्पाप बळींच्या घटनेचा तपास अधिक वेगाने पूर्ण होईल.