LPG import Via Sea Route: मध्यपूर्वेतील युद्ध आणि इराणने महत्त्वाच्या तेल मार्गांवर घातलेल्या निर्बंधांमुळे भारतात एलपीजी (LPG) पुरवठ्यावर परिणाम दिसू लागला आहे. देशातील अनेक भागांमध्ये गॅस एजन्सीसमोर लांब रांगा लागत असून, काही ठिकाणी गॅस सिलेंडरच्या टंचाईविरोधात आंदोलनही केले जात आहे. विशेष म्हणजे, भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 40 टक्के घरगुती गॅस देशात तयार करतो, तर उर्वरित 60 टक्के परदेशातून आयात करतो. त्यामुळे जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम देशातील गॅस पुरवठ्यावर होत आहे.
पश्चिम आशियावर भारताचे मोठे अवलंबित्व
भारत मोठ्या प्रमाणावर पश्चिम आशियातील देशांवर एलपीजीसाठी अवलंबून आहे. विशेषतः कतार, संयुक्त अरब अमिरात आणि कुवैत या देशांमधून भारत मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅस आयात करतो. भारत आणि कतार यांच्यात सुमारे 2500 किलोमीटरचे अंतर आहे. भारतात आयात होणाऱ्या गॅसपैकी जवळपास 90 टक्के एलपीजी इराणच्या ताब्यात असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' ओलांडून भारतात पोहोचते.
समुद्रमार्गे कशी येते LPG?
घरांमध्ये वापरली जाणारी LPG थेट त्या स्वरूपात वाहतूक केली जात नाही. LPG ही मुख्यतः ब्यूटेन आणि प्रोपेन या वायूंच्या मिश्रणापासून तयार होते. वाहतुकीसाठी या गॅसला प्रथम दाब देऊन द्रवरूपात (लिक्विड) बदलले जाते. त्यामुळे ती कमी जागा व्यापते आणि मोठ्या प्रमाणात गॅस एकाच वेळी वाहून नेता येते. यासाठी विशेष प्रकारची LPG कॅरियर जहाजे वापरली जातात. या जहाजांमध्ये तापमान आणि दाब नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष प्रणाली बसवलेली असते.
भारतातील प्रमुख बंदरांवर पोहोचते LPG
सामान्यतः LPG स्ट्रेट ऑफ होर्मुज आणि अरबी समुद्रातून प्रवास करत भारतातील काही प्रमुख बंदरांवर पोहोचते. त्यामध्ये मुख्यतः दाहेज (गुजरात),मंगलुरू (कर्नाटक) आणि विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) या बंदरांचा समावेश आहे. या बंदरांवर गॅस उतरवल्यानंतर ती पाइपलाइनद्वारे मोठ्या स्टोरेज टँकमध्ये साठवली जाते. त्यानंतर ती टँकर ट्रक किंवा रेल्वे टँकरद्वारे बॉटलिंग प्लांटमध्ये पाठवली जाते.
सिलेंडरमध्ये भरून घरापर्यंत पुरवठा
बॉटलिंग प्लांटमध्ये LPG गॅस सिलेंडरमध्ये भरली जाते आणि त्यानंतर वितरकांच्या माध्यमातून ती घराघरांपर्यंत पोहोचवली जाते. LPG वाहतुकीदरम्यान अपघात टाळण्यासाठी अनेक सुरक्षा उपाय केले जातात. गॅस लोड करण्यापूर्वी कार्गो टँकमध्ये नायट्रोजन गॅस भरली जाते, ज्यामुळे ऑक्सिजन पूर्णपणे बाहेर काढला जातो आणि स्फोटाचा धोका कमी होतो. गॅस द्रवरूपात साठवताना तापमान हळूहळू कमी केले जाते, जेणेकरून त्याच्या गुणधर्मांमध्ये बदल होऊ नये. जहाजांमध्ये ऑनबोर्ड प्लांट बसवलेले असतात, जे प्रवासादरम्यान तापमान आणि दाब नियंत्रणात ठेवतात.
होर्मुज मार्गावर संकट
सध्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरातील तणावामुळे गॅस वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता आहे. हा मार्ग जागतिक ऊर्जा व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, जर हा मार्ग दीर्घकाळ बंद राहिला तर भारतासह अनेक देशांच्या ऊर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
Web Summary : India imports 60% of its LPG, mainly from West Asia via sea. Gas is liquefied for transport and shipped to ports like Dahej, Mangalore, and Visakhapatnam. It's then bottled and distributed. Tensions in the Strait of Hormuz pose a threat to supply.
Web Summary : भारत अपनी एलपीजी का 60% समुद्र के रास्ते मुख्य रूप से पश्चिम एशिया से आयात करता है। गैस को परिवहन के लिए द्रवीभूत किया जाता है और दाहेज, मंगलौर और विशाखापत्तनम जैसे बंदरगाहों पर भेजा जाता है। फिर इसे बोतलबंद करके वितरित किया जाता है। होर्मुज जलडमरूमध्य में तनाव आपूर्ति के लिए खतरा है।