मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 19:34 IST2025-12-07T19:34:03+5:302025-12-07T19:34:25+5:30
London Heathrow Airport pepper spray assault: लंडनमधील हिथ्रो विमानतळावरील टर्मिनल ३ वर आज एक धक्कादायक घटना घडली. येथे काही अज्ञात व्यक्तींनी काळ्या मिरचीच्या स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला केला. हल्लेखोर व्यक्तींच्या टोळक्याने अनेक प्रवाशांवर या स्प्रेद्वारे हल्ला करून घटनास्थळावरून पोबारा केला.

मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
लंडनमधील हिथ्रो विमानतळावरील टर्मिनल ३ वर आज एक धक्कादायक घटना घडली. येथे काही अज्ञात व्यक्तींनी काळ्या मिरचीच्या स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला केला. हल्लेखोर व्यक्तींच्या टोळक्याने अनेक प्रवाशांवर या स्प्रेद्वारे हल्ला करून घटनास्थळावरून पोबारा केला. सकाळी ८ वाजून ११ मिनिटांच्या सुमाारास कार पार्किंगमधून अनेक लोकांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली, असे पोलिसांनी सांगितले.
हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत बहुतांश हल्लेखोर फरार झाले होते. मात्र एका आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेसंदर्भात आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामधून ही घटना आपापसातील वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे दहशतवादी कृत्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र या संपूर्ण घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाली. तसेच आजूबाजूच्या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. सध्या सशस्त्र पोलीस अटक केलेल्या व्यक्तीकडे अधिक चौकशी करत आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लंडन अॅम्ब्युलेन्स सर्व्हिसने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यांना झालेल्या जखमा गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. तसेच हे दहशतवादी कृत्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एकमेकांना ओळखत असलेल्या काही लोकांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून हल्ल्याची ही घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.