तारिक रहमान उद्या घेणार बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ; PM मोदींच्या जागी ओम बिर्ला करणार भारताचे प्रतिनिधित्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 18:29 IST2026-02-15T18:29:26+5:302026-02-15T18:29:26+5:30

बांगलादेशात तारिक रहमान यांच्या शपथविधीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहणार आहेत.

Lok Sabha Speaker Om Birla to Represent India at Tarique Rahman Swearing in Ceremony in Dhaka | तारिक रहमान उद्या घेणार बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ; PM मोदींच्या जागी ओम बिर्ला करणार भारताचे प्रतिनिधित्व

तारिक रहमान उद्या घेणार बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ; PM मोदींच्या जागी ओम बिर्ला करणार भारताचे प्रतिनिधित्व

Om Birla: शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर बांगलादेशात झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान १७ फेब्रुवारी रोजी बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या महत्त्वाच्या सोहळ्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला करणार आहेत.

पंतप्रधान मोदी का जाणार नाहीत?

बांगलादेशने या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले होते. मात्र, १७ फेब्रुवारीला मुंबईत पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात महत्त्वाची द्विपक्षीय बैठक होणार आहे. तसेच भारतात एआय इम्पॅक्ट समिटचेही आयोजन करण्यात आले आहे. या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मोदींच्या ऐवजी ओम बिरला आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी ढाका येथे जाणार आहेत.

निवडणुकीत बीएनपीचे वादळ; शेख हसीनांचा पक्ष बाहेर

बांगलादेशच्या १३ व्या राष्ट्रीय निवडणुकीत तारिक रहमान यांच्या बीएनपीने २९७ पैकी २०९ जागा जिंकून दोन दशकांनंतर सत्तेत पुनरागमन केले आहे. त्यांच्यासोबत युती असलेल्या जमात-ए-इस्लामी पक्षाला ६८ जागा मिळाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला या निवडणुकीत लढण्याची परवानगी नव्हती.

भारत-बांगलादेश संबंधांचे नवीन पर्व?

गेल्या वर्षी बांगलादेशात झालेल्या बंडाळीनंतर आणि शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यामुळे दोन्ही देशांतील संबंध काहीसे ताणले गेले होते. मात्र, तारिक रहमान यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. "भारत आणि बांगलादेश हे जवळचे शेजारी आहेत. आम्ही दोन्ही देशांच्या शांतता आणि प्रगतीसाठी एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहोत," असा संदेश पंतप्रधान मोदींनी दिला आहे.

कोण आहेत तारिक रहमान?

तारिक रहमान हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांचे पुत्र आहेत. गेल्या १७ वर्षांपासून ते लंडनमध्ये निर्वासित जीवन जगत होते. तिथूनच त्यांनी आपल्या पक्षाचे नेतृत्व केले आणि आता ते देशाचे पंतप्रधान बनणार आहेत.

सोहळ्यासाठी जगभरातील पाहुणे

या शपथविधीसाठी भारतासह चीन, पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की, युएई आणि श्रीलंकेसह एकूण १३ देशांना आमंत्रित करण्यात आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Web Title : तारिक रहमान बनेंगे बांग्लादेश के पीएम; ओम बिरला करेंगे भारत का प्रतिनिधित्व

Web Summary : तारीक रहमान बांग्लादेश के नए पीएम बनेंगे, उनकी पार्टी की जीत के बाद। पीएम मोदी की पूर्व प्रतिबद्धताओं के कारण ओम बिरला शपथ ग्रहण समारोह में भारत का प्रतिनिधित्व करेंगे। शेख हसीना की पार्टी पर प्रतिबंध के बाद बीएनपी जीती। संबंध सुधर सकते हैं।

Web Title : Tarique Rahman to be Bangladesh PM; Om Birla to Represent India

Web Summary : Tarique Rahman will be Bangladesh's new PM after his party's victory. Om Birla will represent India at the oath ceremony due to PM Modi's prior commitments. BNP won after Sheikh Hasina's party was barred. Relations may improve.